
नालासोपारा विधानसभा मतदारसंघात प्रचाराचा धुरळा आकाशाला भिडला असून; शिवसेनेच्या भगव्या रंगाने बहुजन विकास आघाडीच्या पिवळ्या रंगाला झाकोळून टाकले आहे. मी आणि माझे अप्पा करणाऱ्या बविआच्या बारा भानगडी शिवसेनेने चव्हाट्यावर आणल्या आहेत.
सोशल मीडियावर शिवसेनेने, बहुजन विकास आघाडीचे महापालिकेतील विविध घोटाळे, पाणी प्रश्न, मालमत्ता करात झालेली फसवणूक, बहुजन विकास आघाडीची दादागिरी, शहरातील वाहतूक कोंडी, अनधिकृत बांधकामे अशी कुंडलीच मांडली आहे. विविध समस्यांवरील कार्टून्स, लघुसंदेश, चित्रफीत आणि ऑडियो चित्रफिती यांचा कलात्मक वापर करून शिवसेनेने बहुजन विकास आघाडीवर मात केली आहे.
नालासोपारा मतदारसंघातील शिवसेना उमेदवार प्रदीप शर्मा यांच्या ‘माचो’ आणि ‘डैशिंग’ प्रतिमेचा योग्य वापर करत काही सुरेख आणि लक्षवेधी गाणी बनवली गेली आहेत. प्रदीप शर्मा यांच्या प्रचारासाठी बनवलेली बहुजन विकास आघाडीला ‘टार्गेट’ करणारी कार्टून्स सर्वाधिक लक्षवेधी आणि बहुजन विकास आघाडीवर थेट हल्ला करणारी आहेत.
बहुजन विकास आघाडीचा सोशल मीडिया प्रचार हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांच्याभोवतीच फिरतो आहे. तब्बल 30 वर्षे विकास घडवून आणल्याचा दावा करणाऱ्या या पक्षाची ‘विकासकामे’ आहेत तरी नेमकी कुठली आणि ती शोधावी तरी कुठे? असा प्रश्न यामुळे सोशल मीडिया तरबेज तरूणाईला पडला आहे.
येत्या काही दिवसांत हे दोन्ही पक्ष आपल्या प्रचाराची गती कशी राखतात, यावर या दोन्ही पक्षांचे भवितव्य ठरणार आहे. नालासोपारा येथे क्षितिज ठाकूर यांच्यासाठी हितेंद्र ठाकूर आणि बविआला सर्वाधिक घाम गाळावा लागणार आहे. कारण नालासोपारा येथील झुंज सर्वात अटीतटीची असणार आहे.