
मागील काही दिवसांत वसई-विरार महापालिकेच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी घडल्या. वसई-विरार महापौर पदाची माळ प्रवीण शेट्टी यांच्या गळ्यात; तर स्थायी समिती सभापती पदाच्या तिजोरीची चावी नगरसेवक प्रशांत राऊत यांच्या हाती दिली गेली. खरे तर हे सगळे अनपेक्षित होते…आणि अनपेक्षित घडले.
कारण या आधी वसई-विरारचे महापौर रूपेश जाधव होते. तर स्थायी समितीपदी सुदेश चौधरी. काही दिवसांपूर्वी रूपेश जाधव यांनी आपल्या पदाचा अचानक राजीनामा दिला. पक्षनेतृत्त्वाने तातडीने तो स्वीकारलाही. तेव्हापासून बहुजन विकास आघाडीच्या राजकीय विश्वात अनेक पडसाद आणि प्रतिक्रिया उमटल्या. असे काही घडेल किंवा होईल, अशी अपेक्षा कुणालाच नव्हती. त्यामुळे रूपेश जाधव यांच्या राजीनाम्यामागील कारण सांशकतेने पाहिले जाऊ लागले. त्याबाबत विविध तर्कवितर्क लावले जाऊ लागले.
पण रूपेश जाधव यांनी जे कारण सांगितले ते गृहीत धरले तरी इतर प्रश्नही कायम राहतात.* वसई-विरार शहराचे महापौर पद सर्वसाधारण गटासाठी होते. त्यानंतरही पक्षनेतृत्त्वाने हे पद मागासवर्गासाठी दिले होते. आपल्या पदाचा दीड वर्षाचा कालावधी संपला असून; पुढे हे पद मागासवर्गासाठी असेल तेव्हा पुन्हा आपल्याला संधी मिळेल, असे कारण देऊन रूपेश जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.
रूपेश जाधव ते नवी नियुक्ती या कालावधीत कित्येक नावे पुढे आली. यात उमशे नाईक यांचे नाव प्राधान्याने घेतले जात होते. त्यांचा राजकीय अनुभव पाहता हे पद त्यांना मिळावे, असे काहींचे म्हणणे होते. या सोबतच प्रवीण शेट्टी, भरत मकवाना, सुदेश चौधरी यांच्या नावांची चर्चाही जोरात होती.* केवळ *स्थायी समिती पदाची लॉटरी ही महापौरपदासोबतचा बम्पर ड्रॉ होता.
सरतेशेवटी महापौर पदाची माळ प्रवीण शेट्टी आणि स्थायी समिती पदाची चावी प्रशांत राऊत यांच्या हाती अनपेक्षित पडली. या दोघांची निवड झाली तेव्हा खऱ्या अर्थाने पक्ष नेतृत्त्वाने निष्ठावंतांचा गौरव केला, अशी प्रतिक्रियाही उमटली.या दोघांच्या निवडीला थोड़ा उशीरच झाला. कारण *या दोघांना मिळालेला कालावधी अल्प आहे. पण त्यांना काम मोठे करावे लागणार आहे.
या नाट्यमय घडामोडींचे मूळ अखेर निवडणुकांवर येऊन थांबते.* यासाठी आपल्याला दोन पावले मागे जाऊन पहावे लागेल. मागच्या लोकसभा निवडणुकीत नालासोपारा मतदार संघात बहुजन विकास आघाडीला मोठा फ़टका बसला. तब्बल 26 हजार मतांचा हा फ़टका होता. त्या आधीच्याच लोकसभा पोटनिवडणुकीत याच भागातील मते निर्णायक ठरतील म्हणून बहुजन विकास आघाडीने या भागात सर्वात जास्त सभा घेतल्या होत्या. मात्र पुढच्याच निवडणुकीत हीच मते शिवसेनेच्या पदरात पडली. याच भागातील मते निर्णायक ठरतील आणि ती बहुजन विकास आघाडीला मिळतील, अशी भीती शिवसेना आमदार रवि फाटक यांनी मुख्यमंत्री सभेच्या पाहणी दौऱ्यादरम्यान व्यक्त केली होती. पण झाले उलटेच!
ही सर्व निर्णायक मते अबाधित ठेवणे, ही सर्वस्वी जबाबदारी रूपेश जाधव यांची होती. पण ते यात सपशेल अपयशी ठरले. सर्वसाधारण गटाचे महापौर असतानाही त्यांना हे पद देताना पक्षनेतृत्त्वाचे हेच राजकीय गणित होते. हे गणित मांडताना या पदावर हक्क सांगू शकत असलेल्या उमेश नाईक यांनाही वजा केले गेले होते. साहजिकच या गणितामुळे उमेश नाईक आणि रूपेश जाधव यांची बेरीज कधी झाली नाही. उमेश नाईक लोकसभा निवडणुकीत थोड़े लांब राहिले, असे म्हटले गेले. याचा परिणाम शिवसेनेला अपेक्षित असा आला.
तेव्हापासून बहुजन विकास आघाडीत खड़खद होती. लोकसभा निवडणूक निकालानंतर पक्षनेतृत्त्वाने ती व्यक्तही केली. आपल्याच माणसांनी दगाफ़टका केला, अशी खंत व्यक्त केली गेली. यात अनेक होते. पण पराभवाची नैतिक जबाबदारी अर्थातच पक्षनेतृत्त्वाला स्वीकारावी लागणार होती. तशी ती त्यांनी स्वीकारलीही.
पैकी रूपेश जाधव यांचा महापौर पदाचा राजीनामा त्यापैकी एक मानला जातो. कारण आगामी लोकसभा निवडणुकीत याची पुनरावृत्ती पक्षाला नको आहे. कदाचित ही पुनरावृत्ती *नवनियुक्त महापौर प्रवीण शेट्टी आणि प्रशांत राऊत हे निष्ठावंत टाळतील, अशी अपेक्षा पक्षनेतृत्त्वाला असावी.
वसईतून उमेदवारी करत असताना आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या मदतीला ‘दक्षिणेचे वारे’ नेहमीच मदतीला आले आहेत. त्यामुळे हितेंद्र ठाकूर यांनीही आपले प्रेमही दक्षिण भारतीय मतदारांच्या प्रति वेळोवेळी व्यक्त केले आहे. मागील वर्षी केरळला दिलेली पूर मदत ही त्याचीच प्रचिती होती. आणि आता प्रवीण शेट्टी यांना महापौर पद देऊन निष्ठावंताचा केला गेलेला गौरव हे त्याचेच उदाहरण मानले जात आहे.
प्रशांत राऊत यांच्याबाबतही हेच म्हणावे लागेल. विरारमधील स्थित्यंतरांत त्यांनी आपला झंझावात कायम ठेवला. तोही तब्बल 20 वर्षे. एकनिष्ठपणे. या 20 वर्षांत स्थायी समिती पद देऊन त्यांचा पहिल्यांदा गौरव करण्यात आला. मागील लोकसभा निवडणुकीत प्रशांत राऊत यांनी आपल्या प्रभागासह परिसरातील सर्व मते बहुजन विकास आघाडीकड़े कायम ठेवण्यात यश मिळवले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीसमोर असलेली आव्हाने पाहता प्रशांत राऊत पक्षासाठी ‘संकटमोचक’ ठरतील*, अशी शक्यता गृहीत धरून पक्षनेतृत्त्वाने हे पद त्यांना दिले असल्याचे म्हटले जात आहे.
अर्थात प्रशांत राऊत यांच्या राजकीय वाटचालीतील मार्गदर्शक आणि सल्लागार अजीव पाटील यांच्या मुत्सद्दी राजकारणाने मोलाची भूमिका बजावली आहे.
प्रवीण शेट्टी आणि प्रशांत राऊत यांना मिळालेला काळ अल्प आहे. त्या मानाने त्यांच्यासमोर आव्हाने मोठी आहेत. प्रवीण शेट्टी आपल्या अनुभवाचा आणि प्रशांत राऊत पालिकेच्या भरलेल्या तिजोरीचा विनियोग जनतेसाठी कसा करतात; यावर जरी बहुजन विकास आघाडीचे भवितव्य अवलंबून असले तरी सत्तेचा मार्ग पालिकेतून जातो हे खरे! आणि या मार्गावरुन आपल्याला निष्ठावंतच नेतील; हे उशिरा का होईना पक्ष नेतृत्त्वाला पटले हे त्याहूनही बरे!

