सामाजिक कार्यकर्ते चरण भट यांचा घणाघात

प्रतिनिधी विरार : वसई-विरार महापालिकेने २०१४ साली वसई-विरार शहरातील मालमत्ता आणि महापालिकेचा मालमत्ता कर भरणाऱ्या नागरिक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी १ लाख रुपयांचा अपघाती विमा पत्र घेण्याचा निर्णय घेतला होता; यासाठी महापालिकेने ११ ऑगस्ट २०१४ रोजी जाहीर निविदा सूचना काढली होती; त्यात या विमा पत्रासाठी महापालिका ४० टक्के; तर विमा कंपनी ६० टक्के रक्कम अदा करेल, असे नमूद केले होते.

यासाठी २० आगस्टपर्यंत संबंधित विमा कंपनीकडून निविदाही मागवल्या होत्या; मात्र या महत्त्वाकांक्षी योजनेचे पुढे काय झाले, हे गुलदसत्यातच राहिले.

बहुजन विकास आघाडीच्या १०५ नगरसेवकांनी यासाठी पाठपुरावा केला असता तर आज वसई-विरारकरांना १ लाख रूपयांचे विमाछत्र मिळाले असते; पण बहुजन विकास आघाड़ीची अनास्थाच या महत्त्वाकांक्षी योजनेला नडली आहे, असा घणाघात सामाजिक कार्यकर्ते चरण भट यांनी केला आहे.

या विमा योजनेंर्गत दुर्दैवाने अपंगत्व आल्यास किंवा मृत्यू ओढवल्यास विमाधारकाला १ लाख रुपये मिळाले असते. मात्र निविदा सूचनेपलीकडे ही योजना गेली नाही. त्यामुळे आपण या योजनेसाठी कोणत्या विमा कंपनीने पुढाकार घेतला, या विमा योजनेचे पुढे काय झाले, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता; पालिकेने आपल्यापासून ही माहिती लपवून ठेवली, असा आरोप चरण भट यांनी केला.

गार्डन, बचत गट आणि अन्य भूमिपजन कार्यक्रम यापलीकडे बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक आजपर्यंत गेलेले नाहीत. निवडणुकीदरम्यान भूमिपूजन झालेली कित्येक कामे आजपर्यंत मार्गी लागलेली नाहीत. त्यापेक्षा नागरिकांना संरक्षक विम्याची जास्त गरज होती. आज कोविड-१९ सारख्या संकटकाळात त्याची अत्यंत गरज जाणवते आहे.

मात्र बहुजन विकास आघाडीच्या नगरसेवकांनी नागरिकांसाठी उपयोगी ठरतील अशा कोणत्याच योजनांत रस दाखवला नाही. उलट केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना बहुजन विकास आघाडीच्याच असल्याचा भास निर्माण करून नागरिकांची दिशाभूल केली असल्याचेही चरण भट म्हणाले.

दरम्यान; २०१४ च्या या विमा योजनेवर आयुक्त गंगाथरन डी. यांनी पुनर्विचार करावा, अशी सूचना चरण भट यांनी केली आहे. या सूचनेवर सकारात्मक विचार झाल्यास वसई-विरारमधील सहा लाख मालमत्तासह लाखो लोकांना याचा फायदा होणार, असल्याचे चरण भट यांनी आयुक्तांना सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *