
विरार (प्रतिनिधी) विरोधात बातमी केल्याचा राग मनात धरून चार जणांनी चक्क पत्रकारावर हल्ला केल्याची घटना रविवारी दुपारी विरार पूर्व येथील कोपरी गावात घडली.या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ऐन लॉक डाउनच्या काळात जमाव जमवून केलेल्या ह्या हल्ल्यामुळे कोपरी गावात तणावाचे वातावरण पसरले होते.विरारच्या कोपरी गावातील एका इसमाच्या बंगल्यात डांबून ठेवलेल्या एका हरणाची सुटका मांडवी वन विभागाने दोन महिन्याआधी केली होती.त्यानंतर माध्यमांनीही हा प्रकार निभिर्ड पणे जनतेच्या समोर मांडला होता या मध्ये पत्रकार विपुल पाटील यांनी देखील हा प्रकार संबंधित प्रसार वाहिनीवर प्रसारित केला होता.तसेच हरिण डांबून ठेवल्या प्रकरणी दोघांना वनविभागाकडून अटक करण्यात आली होती.मात्र बंगल्यात हरण डांबून ठेवले असल्याची गुप्त माहिती वनविभागाला विपुल पाटील यांनीच दिल्याचा आरोप करत रविवारी सकाळी एका कुटुंबीयांनी गावात जमाव जमवून पत्रकार विपुल पाटील व त्यांच्या कुटुंबावर हल्ला केला.यामध्ये कोपरी गावातील चौघांचा समावेश असून त्यांनी पत्रकार विपुल पाटील यांच्या कुटुंबीयांनी मारहाण करण्यात आल्याचे पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकाराबाबत विरार पोलिसांनी चौघांवर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. या प्रकाराबाबत सर्वसामान्य नागरिकांमधून संताप व्यक्त होत असून पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यावर प्रशासनाकडून कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.पत्रकारावर बातम्यांमुळे होणारे हल्ले हे माध्यमांची गळचेपी करणारे आहेत. त्यामुळे अशा आरोपीवर पत्रकार संरक्षण कायदांतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी पत्रकारातुन पुढे येत आहे.