
बालकांमधील आजारापासून बालकांचे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी तसेच त्यास प्रतिबंध घालण्यासाठी लसीकरण कार्यक्रम राज्यभर सुरू करण्यात आलेला आहे. दरवर्षी राज्यात मोठया प्रमाणात बालकांमध्ये सर्वसाधारणपणे पावसाळ्यात व हिवाळ्यात सर्दी, थंडी-ताप, न्युमोनिया या आजारांची लागण होत असते. कोविड-19 च्या परिस्थितीत तिस-या लाटेमध्ये बालकांमध्ये कोरोनाची लागण होण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे बालकांच्या पाल्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेक सर्वसामान्य नागरिक भीतीने बालकांना घेऊन शासकीय व महानगरपालिका रुग्णालयांकडे धाव घेत आहेत. परंतु ही लस कोणत्याही शासकीय रुग्णालयात किंवा महापालिकेच्या रुग्णालयामध्ये उपलब्ध नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना खाजगी बालरोग तज्ञांकडे जाऊन प्रती लसीची किंमत रू. 2000/- देऊन या दोन्हीं लसी घेणे सर्वसामान्यांना आर्थिकदृष्टया परवडणारे नव्हते. जास्तीत जास्त नागरिकांना आपल्या बालकांना न्युमोनिया आणि इन्फ्ल्युएन्झा प्रतिबंधक लसी देता याव्यात त्यासाठी त्या शासकीय रुग्णालयांत व महानगरपालिकेच्या रुग्णालयांत मोफत उपलब्ध करून मिळण्याची मागणी वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा.उध्दवजी ठाकरे व आरोग्य मंत्री राजेशजी टोपे यांचेकडे केलेली होती. सदर मागणीचा प्राधान्याने विचार करून राज्याच्या लसीकरण मोहिमेत न्युमोनिया लसीचा समावेश करण्यात आलेला असून त्याचा फायदा संपूर्ण राज्यातील बालकांना होणार आहे. त्याबद्दल आमदार हितेंद्र ठाकूर ह्यांनी राज्याचे मुख्यमंत्री व आरोग्य मंत्री ह्यांचे आभार मानले आहेत. ज्या प्रमाणे शासनाने न्युमोनिया लसीचा समावेश राज्याच्या लसीकरण मोहिमेत करून दिला त्याचप्रमाणे इन्फ्ल्युएन्झा लसीचा देखील समोवश राज्याच्या लसीकरण मोहिमेत करून देण्यात यावा अशी विनंती करण्यात येत आहे.