
दि.७ डिसेंबर २०२२ रोजी ‘लोकमत’ या वर्तमान पत्रात बुलेट ट्रेनसाठी १३६८ वृक्ष तोडण्यासाठी अधिसूचना काढण्यात आली आहे. त्यात हरकती घेण्यासाठी १२ डिसेंबर २०२२ पर्यंत म्हणजेच केवळ ६दिवसांची मुदत दिली आहे. ही मुदत एक महिन्याची देणे आवश्यक होते.एवढ्या कमी दिवसात हरकती नोंदविणे सामान्य नागरिकांना अवघड आहे. तरी आमची १३६८ वृक्ष तोडण्यास हरकत आहे. अशी मागणी वसई-विरार शहर , जनता दलाचे (से) अध्यक्ष, कुमार राऊत व महाराष्ट्र प्रदेश जनता दलाचे (से) उपाध्यक्ष, मनवेल तुस्कानो यांनी आयुक्त, वसई-विरार शहर महानगरपालिका यांच्याकडे केली आहे.
वसई-विरार आणि मुंबई महानगर प्रदेशाला प्रदूषणाचा विळखा पडला आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे सर्वत्र वाहतुकीची कोंडी व शहरात पराकोटीचे प्रदूषण वाढले आहे. यातून रोगराईचे प्रमाण वाढले आहे. नागरीकरणामुळे या आधीच निसर्ग संपदेची मोठी हानी झाली आहे. म्हणून मुंबईच्या वेशीवरील शुध्द हवेची फुफ्फुसे असा लौकिक असलेला वसई तालुका आणि आता उरलेली समृध्द निसर्ग संपदा जतन करण्याची गरज आहे. म्हणून एकाही वृक्षाची कत्तल करण्यास आमचा विरोध आहे.
वृक्षतोड करताना नवीन झाडे लावण्याचे गाजर जनतेला दाखवू नये. जुने वृक्ष ४०-५० वर्षांपासूनचे आहेत. त्याची भरपाई आता नवे वृक्ष लावून होऊ शकत नाही. महानगरपालिकेने किती झाडे लावली? त्यातून किती वाढली? त्यासाठी किती खर्च झाला? ग्रामीण भागात मुळची वृक्ष संपदा आहे. तेथे झाडे लावली जात असल्याच व वाढविलेले दिसत नाही. तेथील नागरिकांकडून वृक्षकर का वसूल केला जातो? याची आम्हाला माहिती द्यावी.
कृपया वृक्षतोड करु नये अशी आमची मागणी आहे. विस्ताराने निवेदन देण्याचा हक्क राखून ठेवला आहे. आमची विनंती मान्य न केल्यास आमच्या जनता दल (से), वसई विरार शहर पक्षाला आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही. तरी नोंद घेण्यात यावी.