
नाहरकत दाखला व गौणखनिज परवण्याशिवाय उत्खनन केल्याचा ठपका
रस्ते बांधकाम करण्यासाठी महाराष्ट्रात अग्रस्थानी असलेल्या विक्रमगड येथील जिजाऊ कन्स्ट्रक्शन कंपनीला एक अब्ज दंडाची नोटीस पाठवण्यात आले आहे. जिजाऊ कन्स्ट्रक्शन कंपनीने वाडा तालुक्यातील कुमदल ( रायसळ) गावात बेकायदा उत्खनन केल्याचे निदर्शनास आल्यानंतर वाड्याचे तहसीलदार डॉ.उद्धव जाधव यांनी जिजाऊला १ अब्ज ५ कोटी २६ लाख १७ हजार ५० रुपयांच्या दंडाची आकारणी करून नोटीस पाठवली आहे. सात दिवसात जिजाऊमार्फत म्हणणे सादर न केल्यास हा दंड वसूल केला जाणार आहे.
जिजाऊचे निलेश सांबरे यांची कुमदल (रायसळ) गावात गट नंबर ४३/२ व ४३/५ येथे दगडांची खदान आहे. येथे उत्खनन सुरू असताना अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता पर्यावरण नाहरकत दाखला व कोणतीही गौणखनिज उत्खनन परवानगी नव्हती. त्यांना नाहरकत शिवाय परवानगी देऊ नये असेही आदेश आहेत. तरीही येथे उत्खनन सुरू होत.यावर आलेल्या तक्रारीनुसार मंडळ अधिकारी कंचाड यांनी पाहणी करून पंचनामा केला. दिड महिन्यांपासून या कंपनीने बेकायदा गौणखनिज उत्खनन केल्याचा ठपका ठेवत कंपनीने १ लाख ३७ हजार ५९७ ब्रास दगडाचे उत्खनन केल्यामुळे कंपनी विरोधात तब्बल १ अब्ज ५ कोटी २६ लाख १७ हजार ५० रुपयांच्या दंडाची कारवाई करण्यात येईल अशी नोटीस त्यांना पाठवण्यात आले आहे. या नोटीसीचे उत्तर देण्यासाठी कंपनीला सात दिवसांची मुदत वाडा तहसीलदार यांनी दिली आहे. याकाळात कागदपत्रे देण्यात कसूर केल्यास दंड वसूल केला जाऊन कारवाई केली जाईल असे तहसीलदार कार्यालयाने नोटिशीत म्हटले आहे.