

बोईसर ग्रामपंचायतीने विकासकाच्या इमारतींचे सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला असुन लाखो रूपयाचा निधी खर्च केला आहे. यामुळे बोईसर ग्रामपंचायत नागरीकांच्या सुविधांच्या नावाखाली विकासकांचे चोचले पुरवत असल्याने उघड झाले आहे. काटकरपाडा येथे सुस्थितीत असलेली गटारे तोडुन नवीन बांधकाम करण्यात आले आणि त्यामध्ये विकासकाचे सांडपाणी सोडण्याचा ग्रामपंचायतीचा चाललेला घाट स्थानिक नागरीकांनीच मोडुन काढल्याने ग्रामपंचायतीचे पितळ उघडे झाले आहे.
बोईसर काटकरपाडा भागात तिन वर्षापूर्वी बांधलेली सुस्थितीत असलेली गटारे बोईसर ग्रामपंचायतीने अचानक तोडुन त्याठिकाणी नवीन गटारे बांधकाम केली. नागरीकांनी व ग्रामपंचायत सदस्यांनी विरोध करून देखील गटाराचे बांधकाम पुर्ण करण्यात आले. नवीन बांधकाम करण्यात येणारी गटारे फक्त विकासकांचे सांडपाणी सोडण्यासाठीच असल्याचा आरोप केला जात होता. याबाबत लोकसत्तांने वृत्त प्रसिद्ध करून ग्रामपंचायतीचा विकासकासाठी असलेला खटाटोप चव्हाट्यावर आणला होता. मात्र मस्तावलेले प्रशासकीय अधिकारी व त्यांना असलेला सत्ताधाऱ्यांचा पाठींबा यामुळे कितीही तक्रारी झाल्या तरी पालघर जिल्हा परिषद व पंचायत समितीचे अधिकारी नेहमीच दुर्लक्ष करत असल्याचे पाहावयास मिळते. यामुळे बेकायदेशीर कामे करण्यासाठी बोईसर मध्ये अधिकाऱ्यांना अधिकच मोकळीक मिळत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
बोईसर ग्रामपंचायतीने काटकरपाडा भागात नागरीकांच्या करातील सात लाख रूपये उधळपट्टी करून गटारे असताना देखील चांगली गटारे साफसफाई करण्याचे सोडुन चक्क गटारेच तोडुन नवीन बांधकाम केले. गटारे नादुरुस्त व नागरीकांची मागणी असल्याचा दावा ग्रामविकास अधिकारी कमलेश संखे यांनी केला होता. परंतु विकासकाच्या इमारतीच्या गटारे गावातील नवीन बांधकाम करणाऱ्या गटारांना जोडण्याच्या कामाची सुरूवात केली असतानाच नागरीकांनी काम बंद पाडत विकासकाचे सांडपाणी गटारात सोडण्यास तिव्र विरोध दर्शविला. त्यामुळे सद्यस्थितीत तेथील सांडपाणी गटारे जोडण्याचे काम बंद करण्यात आले आहे. मुळात काटकरपाडा येथील तिनही ग्रामपंचायत सदस्यांनी गटाराच्या कामाला विरोध केला असताना देखील बहुमताच्या नावाखाली सत्ताधारी यांनी ग्रामपंचायतीचा पैसा थेट विकासकाच्या कामासाठी वापरला असल्याचा आरोप केला आहे.
बोईसर ग्रामपंचायतीने सन 2014-2015 च्या दरम्यान काटकर पाडा भागात मुख्य रस्त्यालगत गटार बांधले होते. परंतु येथील ओत्सवाल वँली विकासकाचे सांडपाणी निचरा होण्याचा जबाबदारी स्विकारलेल्या काही सत्ताधारी लोकांनी येथे नवीन गटार बांधण्याचा घाट घातला होता. त्यातच महत्त्वाचे म्हणजे सन 2017 मध्ये याभागात पुन्हा नवीन गटार बांधावे यासाठी निविदा काढली होती त्यावेळी काम करता आले नाही हे संपूर्ण काम हे दोन टप्यात असुन सद्या कृतिका कन्ट्रक्शन या बांधकाम व्यवसाईकालाने गटारांचे काम केले आहे. यामुळे बोईसर ग्रामपंचायत खासगी विकासकांने करावयाची कामे ग्रामपंचायत निधीतून करत असल्याने ग्रामपंचायतीच्या आजवर केलेल्या कामाची चौकशी करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.
⚫ अभियंत्यावर कारवाई करण्याची मागणी
काटकर पाडा भागात गटारे सुरुवातीपासून बांधलेली असताना ग्रामपंचायतीने जरी पंचायत समिती बांधकाम विभागाला नवीन कामाचे मुल्यांकन बनविण्यासाठी पत्र दिले तरी याबाबत प्रत्येक्षात जागेवर जावुन कामाची पाहणी करणे बंधनकारक असते. परंतु पंचायत समितीचे शाखा अभियंता हेमंत भोईर यांनी कोणत्याही प्रकारे जागेवर जावुन पाहणी न करताच नियमबाह्य पणे काम काही वर्षापूर्वी झालेले असताना नवीन गटार बांधकाम करण्यासाठी अंदाजपत्रक बनविले आहे. यामुळे संबंधित प्रकरणाची चौकशी करून अभियंत्यावर कारवाई करण्याची मागणी जोरधरू लागली आहे.
सांडपाणी गटारात सोडण्यासाठी सुरू असलेले काम स्थानिकांनी अडवले असुन सद्यस्थितीत काम बंद आहे. मासिक सभेत यावर चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल.
— कमलेश संखे, ग्रामविकास अधिकारी बोईसर