
नालासोपारा :- बोगस डॉक्टर हेमंत पाटील याच्यावर बुधवारी एका महिलेने तक्रार दिल्यावर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी वसई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बोगस डॉक्टरला वसई पोलिसांनी मंगळवारी रात्री ठाण्याहून अटक केली होती. आरोपी डॉक्टर आता वसई पोलिसांच्या कस्टडीत आहे.
बोगस डॉक्टर हेमंत पाटील उर्फ हेमंत सोनावणे 2018 पासून वसईत अस्थिरोगतज्ञ म्हणून क्लिनिक चालवत नामांकित रुग्णालयात शस्त्रक्रिया देखील करत होता. याप्रकरणी हेमंत पाटील याच्यावर वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र महानगरपालिकेने त्याच्या विरोधात तक्रार दिली नसल्याने त्याला पोलिसांनी चौकशी करून सोडून दिल्यावर तो तेव्हापासून फरार होता. त्याचा सत्र न्यायालयातून अटकपूर्व जामीन नामंजूर झाल्यानंतर मंगळवारी रात्री ठाणे शहरातून अटक करण्यात आली होती. बुधवारी त्याला वसई सत्र न्यायालयात हजर केले असता 18 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. आता या डॉक्टरवर महिला माया केनिया (59) यांनी तक्रार दिल्यावर खुनाचा प्रयत्न हा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी डॉक्टरने 1 जानेवारी ते 1 एप्रिल 2020 दरम्यान वसईच्या पारनाका व इतर क्लिनिकमध्ये महिलेवर शस्त्रक्रिया केली होती. सदर डॉक्टरकडे कोणतेही वैद्यकीय ज्ञान व पदवी नसताना शस्त्रक्रिया केल्यामुळे रक्तस्त्राव होऊन जंतूसंसर्ग होऊ शकतो हे माहीत असतानाही स्पाईनमध्ये इंजेक्शन देऊन महिलेवर चुकीची शस्त्रक्रिया केली. त्यात त्यांना दुखापत करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.