
वसई : वसई-पाचूबंदर येथील मासळी बाजारात शुक्रवारी सकाळी भाजी घेण्यासाठी महिलांची झुंबड़ उडाली होती. या वेळी ‘सामाजिक अंतरा’चे नियम अक्षरशः मोडीत निघाल्याने चेंगराचेंगरी होऊन काही महिलांना दुखापत झाल्याची माहिती आहे. राज्य सरकार आणि जिल्हाधिकऱ्यांचे आदेश बाजार भरवणाऱ्या व्यक्तीकडून धाब्यावर बसवले जात असल्याने यविरोधात पोलिसांनी करवाई करावी, अशी मागणी होत आहे.
वसई-पाचू बंदर येथील मासळी बाजार शुक्रवारी भाजी मार्केट लावण्यासाठी खुला करण्यात आला होता. या बाजार भरवणाऱ्या व्यक्तीकडून ‘सामाजिक अंतरा’चे नियम राखले जातील, अशी अपेक्षा होती. मात्र या दृष्टिकोणातून कोणतीच काळजी घेण्यात आली नाही. परिणामी बाजारात महिलांची भाजी घेण्यासाठी झुंबड़ उडाली.
यातून चेंगराचेंगरी झाल्याने काही महिला येथील काटेरी झाडीत पडल्या. तर काही महिला जमिनीवर पडल्याने त्यांच्या अंगावरुन काही महिला गेल्याने त्यांना दुखापत झाली. मात्र हा प्रकार भाजी मार्केट भरवणाऱ्या व्यक्तीनी लपवून ठेवल्याची माहिती आहे.
