
अन्याय अत्याचाराच्या विरोधात समाजाने एकजुट दाखवावी – आद.भीमराव आंबेडकर
मुंबई-भारतीय घटनेचे शिल्पकार ,भारतरत्न परम पुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेले राजगृह ही केवळ एक वास्तू नसून, जगातील तमाम आंबेडकरी अनुयायांचे श्रध्दास्थान व अस्मिता आहे. 7जुलै रोजी सायंकाळी राजगृहावर दगडफेक, मोडतोड करून देशाच्या संविधान निर्मात्याच्या विचारांवर ,देशभक्ती वर व आंबेडकर कुटुंबावर भयानक हल्ला केला आहे. या भ्याड हल्याने जरी कुठलीही जीवित हानी व मोठी वित्त हानी झाली नसली, तरी भविष्यात यापेक्षा मोठी हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्याचे कारण म्हणजे महाराष्ट्रात कोरोना महामारीच्या साथीमुळे राज्यभर लॉक डाऊन सुरू आहे, त्याकाळात आजपर्यंत बौद्ध, अनुसूचित जाती, जमातीतील लोकांवर जातीयवादी- मनुवादी लोकांनी अन्याय व अत्याचार केलेली नागपूर, पिंपरी-चिंचवड ,बीड, औरंगाबाद ,जालना,परभणी, हिंगोली, अहमदनगर ,जळगाव या जिल्ह्यातील 15 प्रकरणे समोर आलेली आहेत. यातील काही प्रकरणात तर मनुवादी – जातीवाद्यांनी खून केले असून, हातपाय तोडणे, दगडाने ठेचणे तसेच सामुदायिक हल्ला करून मोडतोड करणे, इत्यादी प्रकार करून दहशतीचे व भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. या सर्व प्रकरणांचा आढावा, भारतीय बौध्द महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आद. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली 8 जुलै 2020 रोजी केंद्रीय व महाराष्ट्रातील पदाधिकारी यांची महत्वपूर्ण ऑनलाईन बैठक संपन्न झाली. तीत राजगृह व महाराष्ट्रातील 15 प्रकरणांच्या बाबत तीव्र असंतोष व्यक्त करण्यात आला आणि या बाबत सर्वानीआंदोलन करण्याची भूमिका घेतली. यावेळी आद.भीमराव आंबेडकर यांनी राजगृह च्या घटनेची माहिती सांगून महाराष्ट्र राज्यात जातीयवाद झपाट्याने वाढत असल्याचेच दिसत आहे. सदर अत्याचार हा जातीयवादी, राजकीय सूडबुद्धी स्वरूपाचा आहे की कसा काय? हे अचानक येवढे जातीय तणाव वाढीचे काम कुणाचे आहे? सत्तेवरून महाराष्ट्रामध्ये रस्सीखेच आहे, इत्यादी सर्व अँगलचा पोलिस प्रशासनाने व सरकारने शोध घेणे गरजेचे आहे, अशी आंबेडकरी जनतेची भावना झाली आहे, ती बरोबर असल्याचे प्रतिपादन केले. तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानणाऱ्यांवरच अन्याय अत्याचार होत आहेत. त्यामुळे वेळ प्रसंग पडलाच तर रस्त्यावर उतरून आपली ताकद दाखविणे व प्रत्युत्तर देन्यासाठी समाजाची भीमा -कोरेगाव प्रमाणे एकजूट दाखविणे गरजेचे आहे असे सांगितले.राज्यातील अन्याय अत्याचारांच्या प्रकरणात सतर्क राहून पोलिस व न्यायालयात प्रकरणे लाऊन धरावीत, असेही सांगून समाजाने शांतता व संयम पाळण्याचे आवाहन केले.
राजगृहा च्या व वरील सर्व प्रकारांमुळे आंबेडकरी अनुयायांच्या रागाचा मोठा उद्रेक केंव्हाही उफाळू शकतो, परंतु आंबेडकर परिवाराने शांततेचे आवाहन केल्याने तो सध्यातरी शांत आहे.
थेट राजगृहावर भ्याड हल्ला करून व दगडफेक करून, तोडफोड करून एक प्रकारे या देशाची घटना लिहिणाऱ्या भारतीय राज्य घटनेच्या शिल्पकाराचे कुटुंब सुद्धा सुरक्षित नसल्याची जाणीव करून देण्याचा हा प्रयत्न असून, जो असंविधानिक तर आहेच, शिवाय शिवराय -फुले-शाहू-आंबेडकर यांची जन्मभूमी व कर्म भूमी असल्यामूऴे, पुरोगामी म्हणविणाऱ्या या महाराष्ट्र सरकारसाठी अत्य॔त लाजिरवाणी गोष्ट असल्याचे प्रकर्षाने जाणवते.
सरकारने या संवेदनशील विषयात तात्काळ लक्ष घालून
1) बौध्द, अनुसूचित जाती व जमातीवर झालेल्या अत्याचार प्रकरणाबाबत भारतीय बौद्ध महासभेच्या आद.भीमराव य. आंबेडकर आणि इतर यांच्या दि.22 जून 2020 रोजीच्या निवेदनात केलेल्या 6 मागण्यांप्रमाणे ताबडतोबीने कारवाई व्हावी.
2)राजगृहात तोडफोड करणाऱ्यांना व त्यामागचे असलेले सुत्रधार / मास्टर माईंड तयांना त्वरित शोधून त्यांनी केलेला गुन्हा हा देशद्रोहाचा गुन्हा असल्याने त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. जेणेकरून भविष्यात कुणीही असे निंदनीय कृत्य करण्याचे धाडस करणार नाही.
3) डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची स्मृतीस्थाने जसे की, राजगृह, चैत्यभुमी, डॉ. आंबेडकर भवन, दीक्षाभूमी, जन्मभूमी महू आणि आंबेडकर घराण्याला कायम स्वरूपी उचित पोलीस संरक्षण पुरविण्यात यावे, अशी मागणी करीत आहोत.
वरील प्रकरणांत तात्काळ/ वेळीच कारवाई झाली नाही, तर आंबेडकरी जनक्षोभाचा उद्रेक झाल्याशिवाय रहाणार नाही व अशावेळी परिस्थिती बिघडल्यास, त्याला आपले शासन जबाबदार असेल, असा इशारा भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय महासचिव- जगदीश गवई , राष्ट्रीय सचिव व समता सैनिक दलाचे स्टाफ ऑफिसर- एस के भंडारे, राष्ट्रीय सचिव – एन एम आगाने,बी एच गायकवाड , अॅड.एस एस वानखडे ,एम डी सरोदे , वसंत पराड,प्रभाकर जाधव, भिकाजी कांबळे, एस एस माने, राष्ट्रीय कोषाध्यक्ष – अरुण साळवे यांनी मा. राज्यपाल, मा. मुख्यमंत्री , मा. गृहमंत्री , मा. पोलीस महासंचालक, मा. मुंबई पोलिस आयुक्त यांना 9 जुलै 2020 रोजी पाठविलेल्या निवेदनात केला आहे.