

वसई( प्रतिनिधी ) :राज्य शासन तसेच पालघर जिल्हाधिकारी हद्दीतील दुकाने दुपारी २ वाजेपर्यंत चालू ठेवण्याचे आदेश असताना वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीतील दुकाने सकाळी ११.०० वाजेपर्यंत चालू ठेवण्याच्या निर्णयाला विरोध करीत भारतीय जनता पार्टी वसई विरार जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांच्या नेतृत्वाखाली व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेतल्यानंतर दुकाने २ वाजेपर्यंत चालू ठेवण्याचा निर्णय घेतल्याने व्यापारी वर्ग खुश आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ताळेबंदी चालू असून दि. १.६.२०२१ च्या राज्य सरकार व पालघर जिल्हाधिकारी यांच्या आदेशामध्ये दुकाने सकाळी ७.०० ते २.०० वाजेपर्यंत चालू ठेवण्याचे नमूद असताना वसई विरार शहर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्तांच्या आदेशात दुकाने सकाळी ७.०० ते ११.०० वाजेपर्यंत चालू ठेवण्याचे नमूद असल्यावरून भारतीय जनता पार्टीचे वसई विरार जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांच्या नेतृत्वाखाली व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आयुक्त गंगाथरन डी यांची भेट घेतली व दुकाने सकाळी ७.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत चालू ठेवण्याबाबत निवेदन दिले. त्यामुळे आयुक्तांनी दि. १.६.२०२१ च्या ब्रेक दी चैन च्या निर्णयात सुधारणा करून दुकाने सकाळी ७.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत चालू ठेवण्याचा आदेश जारी केला.
भारतीय जनता पार्टीचे वसई विरार जिल्हाध्यक्ष राजन नाईक, उप जिल्हाध्यक्ष मनोज बारोट, नालासोपारा कपडा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष जयेश माळी, ज्वेलर्स असोसिएशन अध्यक्ष जयंती कोठारी आदि आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत उपस्थित होते.
