

वसई : (प्रतिनिधी) :
वसई तालुक्यात कोरोनाचा आणखी एक नवा रुग्ण आढळल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे लॉक डाऊनची मदत अजून वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सध्या आपत्ती काळाची तीव्रता वाढत असताना त्याचा सर्वाधिक फटका गोर गरीब नागरिकांना बसला आहे. रोजंदारीवर काम करणारे सर्व सामान्य नागरिक हातावर पोट ठेऊन जगत आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी सेवाभावी संस्था अहोरात्र मेहनत करून त्यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करीत आहेत. पोटाचा प्रश्न निर्माण झाला असताना आता मध्यमवर्गीय मुलांच्या शैक्षणिक भवितव्याचा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. लॉक डाऊन संपल्यानंतर प्रामुख्याने याच मध्यमवर्गीय मुलांच्या प्रवेश शुल्क साठी शाळा व्यवस्थापन त्या विद्यार्थ्यांच्या पालकांवर दबावतंत्र निर्माण करण्याची दाट शक्यता आहे. या काळात सदर मध्यम वर्गीय मुलांच्या शैक्षणिक प्रवेश शुल्क साठी संबंधित शाळा व्यवस्थापन यांच्याकडून दबावतंत्र निर्माण होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाने मध्यवर्गिय विद्यार्थ्यांचे तीन महिन्याचे प्रवेश शुल्क माफ करण्याची मागणी भालचंद्र हरी भोईर फाऊनडेशनचे संस्थापक शेखर भालचंद्र भोईर यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांना केली आहे.
सदर निवेदनात त्यांनी पालघर जिल्हा प्रशासना बरोबरच राज्य व देश ज्या पद्धतीने कोरोना विषाणूचा सामना करत आहे ते कौतुकास्पद असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून त्यांचे तीन महिन्यांचे प्रवेश शुल्क माफ करण्याचे आवाहन शेखर भोईर यांनी केले आहे.
उत्तराखंड सरकारने आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांचे तीन महिन्यांचे प्रवेश शुल्क माफ करण्याचे आदेश राज्य शासनाला दिले आहेत. तसाच निर्णय पालघर जिल्हा प्रशासनाने घेण्याची मागणी शेखर भोईर यांनी केली आहे.