

वसई (प्रतिनिधी):- वसई विरार शहर महानगर पालिका कार्यक्षेत्रात तसेच वसई तहसील क्षेत्रात अंदाधुंदपणे झालेल्या व चालू असलेल्या अवैध बांधकामांबाबत विविध वृत्तपत्रांमध्ये बातम्या प्रसिद्ध होत असतात. न्यायालयात याचिका दाखल होतात. मात्र अवैध बांधकामांवर त्याचा कोणताही परिणाम होत नाही. उलट जोरात अवैध बांधकामे चालू आहेत. या संदर्भात आता पत्रकार, भूमाफिया, महानगर पालिका अधिकारी व महसूल अधिकारी यांच्यात शीतयुद्ध पहावयास मिळत असून लवकरच याचा मोठा भडका उडण्याची शक्यता आहे.
जे पत्रकार अवैध बांधकामांबाबत बातम्या छापतात त्यांच्या बाबत भूमाफिया व अधिकाऱ्यांना राग असून पत्रकारांना गुन्ह्यात अडकविण्यासारख्या खेळी खेळल्या जाऊ शकतात. परंतु असे करणे भूमाफिया व अधिकाऱ्यांसाठी नुकसानदायक आहे. काही ठिकाणी अवैध बांधकाम चालू असलेल्या जागेवर भूमाफियांनी टपोरी गुंड प्रवृत्तीच्या असामाजिक तत्वांना उभे करून पत्रकारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे. पत्रकार, भूमाफिया, महानगर पालिका अधिकारी व महसूल अधिकाऱ्यांमधील हा संघर्ष आता कोणत्या टोकाला जातो ते येणारा काळच ठरवेल.
भूमाफिया व अधिकाऱ्यांमध्ये मोठी देवाणघेवाण होत असून अवैध बांधकामांना संरक्षण देण्याकरिता भूमाफिया अधिकाऱ्यांना मोठी लाच देतात. अगदी खुल्लमखुल्ला भ्रष्टाचार होत असून मंत्रालयापर्यंत हप्ते पोहोचत असल्यामुळे भूमाफिया व अधिकारी बिनधास्त आहेत. मात्र एक ना एक दिवस भूमाफिया व अधिकारी यांच्या पापाचा घडा भरणार हे नक्की.