
जिल्हाधिकारी यांच्या परवानगीचा गैरवापर
पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील नालासोपारा येथे एका रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे रुग्णालयात मोठी दुर्घटना घडून रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले होते. असाच हलगर्जीपणा पालघर शहरात सुरू आहे. इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र मिळाले नसताना तळमजल्यावर रिलीफ हॉस्पिटल सुरू ठेवून रुग्णांच्या जीवाशी खेळ खेळला जात आहे. तळमजल्यावर काही अंतर्गत बदल केले आहे असे बोलले जात असतानाही या हॉस्पिटलवर प्रशासन कारवाई करत नाही. या हॉस्पिटलला कोणाचा वरदहस्त आहे असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटे दरम्यान या हॉस्पिटलला जिल्हाधिकारी यांनी उपचार केंद्र सुरू करण्यासाठी परवानगी दिली होती. त्या परवानगीचा गैरवापर हे हॉस्पिटल करत आहे. त्या परवानगीच्या नावाखाली रुग्णांवर सर्रास उपचार केले जात आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात हे हॉस्पिटल सुरू करण्यात आले आहे. इमारतीचा वापर करण्यासाठी भोगवटा प्रमाणपत्र मिळणे गरजेचे आहे. मात्र इमारतीला ते मिळालेले नाही. याउलट नियमांना फाटा देऊन रुग्णालय सुरू आहे. रूग्णालयाचे फायर, इलेक्ट्रिकल ऑडिटही झालेले नाही. त्यामूळे ते रुग्णांसाठी धोकादायक बनले आहे. इमारतीच्या वरच्या मजल्यावर काम सुरू आहे. काम सुरू असताना दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न उभा राहत आहे.
एखादी इमारत व त्यातील जागा वापरण्या लायक होण्यास स्थानिक स्वराज्य संस्थांकडून भोगवटा प्रमाणपत्र घ्यावे लागते. त्याचबरोबरीने जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडे योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता करून तेथून प्रमाणपत्र मिळवल्या नंतरच रुग्णालय सुरू करता येते. मात्र येथे कोणत्याही प्रकारच्या नियमावलीचे पालन केलेले नाही. याउलट जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या परवानगीचा गैरवापर करून कायद्याचे उल्लंघन या रुग्णालय प्रशासनाने केले आहे. त्यामुळे कायद्याला हरताळ फासणाऱ्या या रुग्णालय प्रशासनावर व भोगवटा धारक प्रमाणपत्र न घेतलेल्या इमारत मालकांवर कायदेशीर कारवाईची मागणी पुढे आली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक यांनी या रुग्णालयाला भोगवटा प्रमाणपत्र नसताना रुग्णालय सुरू करण्यासाठी प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे आर्थिक हितसंबंध जपून ते दिले गेल्याचे सांगितले जाते.