

वसई : (प्रतिनिधी) : पालिकेचे नियम धाब्यावर बसवून अवैध बाजार वसुली करणारा वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती आय विभागातील भ्रष्ट लिपिकाला पालिकेने निलंबित केल्यानंतर त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी तक्रारदार महिला पत्रकाराने केली आहे. यासंदर्भातील निवेदन सदर महिला पत्रकाराने पालघरचे खासदार राजेंद्र गावित, श्रमजीवी संघटनेचे विवेक पंडित, महापालिका आयुक्त बळीराम पवार आणि वसई पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षकांना दिले आहे.अधिक वृत्त असे की, साधारण दीड वर्षापूर्वी महापालिकेचा लिपिक बाळाराम साळवी हा प्रभाग समिती आय हद्दीतील बाजार वसूलीत हात सफाई करत असल्याचे महिला पत्रकार यांच्या निदर्शनास आले होते. त्यांनी बाळाराम साळवी याला याप्रकरणी आक्षेप घेतला असता साळवी याने महिला पत्रकार यांना सरकारी कामात अडथळा आणला म्हणुन वसई पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर महिला पत्रकार आणि त्यांच्या दोन पत्रकार मित्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यानंतर महिला पत्रकार यांनी प्रभाग समिती आय चे प्रभारी साहाय्यक आयुक्त रतेश किणी यांच्या निदर्शनास बाळाराम साळवी यांची भ्रष्ट प्रतिमा आणून दिली होती. वस्तुस्थितीजन्य पुरावे पाहता बाळाराम साळवी यांचा भ्रष्टपणा किणी यांच्या निदर्शनास आला होता. त्यांनी याप्रकरणी अहवाल सादर करून बाळाराम पवार यांच्या भ्रष्टपणाचे पुरावे पालिकेचे तत्कालीन आयुक्त सतीश लोखंडे यांना सादर केल्यानंतर त्यांनी बाळाराम साळवी यांना निलंबित केले होते. बाळाराम साळवी यांना निलंबित केल्यानंतर त्यांच्यावर आता शासकीय पदाचा गैरवापर करत पत्रकार महिलेला खोट्या गुन्ह्यात गोवले म्हणून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी महिला पत्रकार यांनी वरील व्यक्तींकडे केली आहे.