

वसई /वार्ताहर: नाळे डिसिल्वा नगर येथील प्यायच्या पाण्याच्या विहिरीत कचराकुंड्या टाकून मद्यपी समाजकंटकांनी पाणी दूषित केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी महापालिका आणि पोलिस प्रशासनाने बघ्याची भूमिका घेतल्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.
वार्ड क्रमांक ३५ प्रभाग समिती ई मधील नगरसेवक मार्शल लोपीस यांच्या कार्यालयासमोर एक विहीर आहे. या विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापरण्यात येते. या गावात नळपाणी योजना नसल्यामुळे या विहिरीच्या पाण्यावर असंख्य ग्रामस्थ अवलंबून आहेत.शुक्रवारी सकाळी या विहिरीत जवळच्या कचराकुंड्या टाकण्यात आल्याचे पाणी भरण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांना तहानलेल्या मुखाने परतावे लागले. या प्रकाराची माहिती मिळाल्यावर पालिका अधिकारी आणि पोलिसांनी विहिरीची पाहणी केली.त्यानंतर मात्र कोणतीही कारवाई झाली नाही. येथील एका मेडिकल समोर रात्रीच्यावेळी काही तरुण ओल्या पार्ट्या करतात.त्यांनीच मद्यधुंद होऊन कचराकुंड्या टाकल्याची शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पाणी ग्रामस्थांच्या मुखातून काढणाऱ्या या समाजकंटकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.
दरम्यान नगरसेवक लोपीस यांच्याशी संपर्क साधला असता, काही चोरट्यांनी हा प्रकार केल्याची माहिती मिळाली आहे.त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असून वीहीर स्वच्छ करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. टीप : तेथील ग्रामस्थांचा आरोप आहे जे मद्यपान करणारे लोक आहे ते विहिरीत कचरा टाकत आहे असा आरोप ग्रामस्थ करत आहे.