
नालासोपारा :- वसई-विरार शहर महानगरपालिकेची निवडणूक कधी होणार हा आता यक्ष प्रश्न म्हणून उभा ठाकला आहे. तर दुसरीकडे राज्य शासनाने महापालिकांना नव्या प्रभागरचना करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र सर्वोच्च न्यायालयात ओबिसी राजकीय आरक्षण आणि सुधारित प्रभागरचना यावरील आदेश प्रलंबित असताना निवडणुका संदर्भातील गुंता वाढत चालला आहे. निवडणुकांचे बिगुल न्यायालयाच्या तारीख पे तारीख अशा कात्रित सापडले असल्याने प्रशासकीय रजावटीत अधिकार्यांची मज्जा सुरू आहे.
प्रभाग रचनांसंदर्भात बुधवारी न्यायालयाने आदेश देणे संयुक्तिक होते. परंतु पुन्हा न्यायालयाने १३ डिसेंबरची तारीख दिल्याने निवडणुकांचा गुंता आणखी किचकट होण्याची शक्यता आहे. न्यायालयात प्रभागरचनांबाबत प्रकरण न्यायप्रविष्ट असताना राज्य शासनाने महापालिकांना प्रभागरचनांबाबत आदेश देणे अनाकलनीय असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आजपर्यंत पालिकेच्या तीन वेळा नव्याने प्रभागरचना झाल्या आहेत. या प्रक्रियेत पालिका अधिकारी मात्र भरडले जात आहेत.
महापालिकेची निवडणूक गेल्या अडीच वर्षांपासून रखडली आहे. अनेक तांत्रिक अडचणीत महानगरपालिकेच्या निवडणुका रखडल्या आहेत. निवडणुकांकडे गांभिर्याने पाहण्याची मानसिकताच उरली नाही, असे दिसून येते. दरम्यान, राज्यभरातील ९२ नगरपालिकांतील ओबिसी राजकीय आरक्षण आणि प्रभागरचनां संदर्भातील सुनावणी आता १३ डिसेंबर रोजी होणार आहे. तुर्तास महानगरपालिकांच्या निवडणुकांचे चित्र आता पुढील सुनावणीत तरी ठरो, अशी अपेक्षा वसईकरांनी केली आहे.