

स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे नागरिकांच्या नरकयातना कायम ?

शिवसेना उपशहर प्रमुख विनायक भोसले यांचा आरोप ?
विरार(प्रतिनिधी)-वसई विरार महापालिका कार्यक्षेत्रात मोडणारा विरार पूर्वेकडील मनवेल पाडा, कारगिल नगर परिसर स्थानिक सत्ताधारी पक्षाच्या माजी नगरसेवकांच्या भ्रष्ट प्रवुत्ती मुळे समस्यांच्या गर्तेत सापडला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधीनी गेल्या १० वर्षात कोणत्याच मूलभूत सुविधा उपलब्ध न केल्याने येथील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे दी.१८ फेब्रुवारी रोजी कारगिल नगर याठिकाणी एका व्यक्तीचा टँकर खाली घेऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याला सर्वस्वी स्थानिक सत्ताधारी पक्षाचे माजी नगरसेवक हेच जबाबदार आहेत असा आरोप शिवसेनेचे विरार उपशहर प्रमुख विनायक भोसले यांनी केला आहे.त्यातच याठिकाणी गेल्या १० वर्षांत बेसुमार अनधिकृत बांधकामे उभी राहिली तसेच सद्या युद्धपातळीवर सुरु ही आहेत.परंतु स्थानिक लोकप्रतिनिधी ही अनधिकृत बांधकामे रोखण्यास सपशेल अपयशी ठरले आहेत.विशेष म्हणजे ही बांधकामे होत असताना हेच लोकप्रतिनिधी दलाल म्हणून काम करत होते.परिणामी याचा भुर्दंड येथील नागरिकांना आता सहन करावा लागत असल्याचे विनायक भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
विशेष म्हणजे कारगील नगरला जाणारा मुख्य रस्ता अरुंद आहे.आधीच अरुंद असलेल्या या रस्त्यावर फेरीवाल्यांनीही आपले बस्तान मांडल्याने चालणेही मुश्कील झाले आहे. त्यातच या परिसरात पाण्याचे टँकर ही दिवसभर येथील सोसायटीमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी ये जा करीत आहेत. परंतु रस्ताच अरुंद आल्याने तसेच फेरीवाल्यांनीही आपली दुकाने मांडल्याने एखादा टँकर जरी आतमध्ये आला तर पूर्ण रस्ताच बंद होतो.त्यातच जो पाणी पुरवण्यात येते तेही पूर्णपणे अशुध्द आहे.या टँकर माफियाविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणीही भोसले यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.तसेच हा टँकर द्वारा होत असलेला पाणीपुरवठा त्वरित बंद करून महापालिकेने मुबलक पाणीपुरवठा येथील नागरिकांना उपलब्ध करून देण्याची मागणी भोसले यांनी केली.
अनधिकृत इमारती उभारून रहिवाशांना सोडले वाऱ्यावर-
स्थानिक लोकप्रतिनिधीनी स्वतःच्या स्वार्थासाठी याठिकाणी शासकीय जागेत मोठ्या प्रमाणावर अनधिकृत इमारती उभ्या करून केवळ स्वतःचे खिसे भरण्याचे काम करत त्या इमारती मधील रहिवाशांना वाऱ्यावर सोडले आहे. याचा भुर्दंड आता नागरीकांना सहन करावा लागत आहे.मुख्यत्त्वे या परिसरात कोकणी वस्ती जास्त असून कोकणी लोकच जास्त बळी पडत असल्याचे दिसून आहे.या विभागातून एकूण ६ नगरसेवक कार्यरत होते. परंतु एकही नगरसेवकांनी येथील समस्या पालिका दरबारी मांडल्या नाहीत.उलटपक्षी अनधिकृत बांधकामे करण्यातच स्वारस्य दाखवले.शिवाय कारगील नगर व मनवेल पाडा विभागात झालेली अनधिकृत बांधकामे ही अत्यंत निकृष्ठ दर्जाची आहेत.त्यामुळे या माजी नगरसेवकांना यावेळी येथील मतदार त्यांची जागा दाखकतील असे मत भोसले यांनी मांडले
तसेच या विषयी जातीने लक्ष घालून येथील अनधिकृत बांधकांमाना जबाबदार संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी भोसले यांनी केली आहे.तसेच येथील फेरीवाल्यांना हटवून टँकर द्वारा होत असलेला अशुद्ध पाणी पुरवठा त्वरीत बंद करून याठिकाणी फेरीवाल्याकडून हप्ते कोण घेतो याची गुन्हे अन्वेषण विभागाकडून सखोल चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.