भाजप आमदार प्रसाद लाड़, माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्ष प्रवेश

प्रतिनिधी

विरार – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विरार शहर सरचिटणीस महेश कदम यांनी अखेर भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. भाजपचे विधान परिषद आमदार व वसई-विरार महापालिका निवडणूक प्रभारी प्रसाद लाड़ यांच्या उपस्थितीत मुंबई-सायन येथील कार्यालयात दुपारी १२ वाजता हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

कल्याणचे माजी आमदार नरेंद्र पवार, भटके विमुक्त युवा आघाडी भाजप महाराष्ट्र सरचिटणीस प्रदेश अशोक शेळके व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात महेश कदम यांच्यासह मनसे विभाग अध्यक्ष समीर निकम व अनेक पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी भाजप प्रवेश केला.

महेश कदम यांनी मागील १६ वर्षे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची विरार येथील धुरा सांभाळली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना व विरार शहर सहसचिव पदाची जबाबदारी निभावताना त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष घराघरात पोचवण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. कोविड-१९ संक्रमण काळातही त्यांनी लक्षवेधी कामगिरी केली होती.

कोविड-१९ संक्रमण काळात लागलेल्या टाळेबंदीमुळे अनेक नागरिकांवर बेकार होण्याची वेळ आली होती. अशा बेरोजगार तरुणांकरता ‘रोजगार मेळावा’ भरवून त्यांना आधार देण्याचे काम महेश कदम यांनी केले होते. या रोजगार मेळाव्यात दोन हजारहून अधिक तरुणांनी सहभाग नोंदवला होता.

विरारमधील दीडशेहून अधिक महिलांना मोफत रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांच्या हातांना बळ देण्याचे कामही कदम यांनी केले आहे. या उल्लेखनीय कामगिरीमुळे अल्पावधितच वसई-विरारच्या राजकीय पटलावर लक्षवधी ठरले होते.

महेश कदम यांची सामाजिक बांधिलकीसोबतच राजकीय कार्यकर्त्यांची वीण घट्ट आहे. विरार पूर्व भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मुख्य चेहरा म्हणून ते ओळखले जात. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाला महत्त्व प्राप्त झाले आहे. महेश कदम यांच्या भाजप प्रवेशामुळे विरार पूर्व भागात भाजपची ताकद वाढेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

विशेष म्हणजे अन्य पक्षांनीही महेश कदम यांच्या पक्ष प्रवेशाकरता मन वळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र कदम यांनी विचारांति भाजप प्रवेश केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *