


डॉक्टर आणि देव या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे समजण्याचा एक काळ होता. हा काळ आता जवळपास इतिहास जमा झाल्यात जमा आहे. वैद्यकीय क्षेत्र काही वर्षांपूर्वी नोबल प्रोफेशन म्हणून ओळखले जात असे. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या डॉक्टरांची पिढी आता जवळजवळ अस्तंगत झाल्यात जमा असून त्यांची जागा हायली प्रोफेशनल, असंवेदनशील आणि नीतिमत्ता खुंटीवर टांगलेल्या डॉक्टरांच्या टोळक्यांनी बळकावलेली आहे.
स्पष्ट शब्दात सांगायचे झाले तर पूर्वीच्या काळी लोकांना लुटण्याचा धंदा करणारे दरोडेखोर ज्याप्रमाणे संघटितपणे टोळी तयार करून एकत्र लुटमार करीत असत त्याप्रमाणे आता अनेक डॉक्टरांनी एकत्र येऊन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या नावाखाली रुग्णांना लुबाडण्याचा त्यांची लुटमार करण्याचा धंदा सुरू केला आहे. मढयाच्या टाळूवरचं लोणी खाणे ही उक्ती सार्थ ठरवण्याचा जणू या दरोडेखोरांनी विडाच उचललेला दिसतोय.
रिद्धी विनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल : संघटित लुटमारीचा अड्डा ?
वैद्यकीय क्षेत्रात संघटित लूटमार करणाऱ्या यादीत एक नाव प्रकर्षाने आणि सातत्याने गेल्या काही वर्षांपासून वसई-विरारमध्ये झळकतंय ते म्हणजे रिद्धी विनायक मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलचे.
कोरोनाबाधित रुग्णाच्या लुबाडणूकीची एक घटना या हॉस्पिटलमधून नुकतीच उजेडात आलेली आहे. ही घटना अतिशय भयावह तर आहेच पण वैद्यकीय क्षेत्रात सुरू असलेल्या गरजू रुग्णांच्या अनिर्बंध लुटमारीवर झगझगीत प्रकाश टाकणारी आहे. या घटनेनंतरही सर्वसामान्यांचे डोळे उघडले नाहीत तर ते वसईकरांचे दुर्दैवच म्हणावे लागेल.
कोरोना बाधित रुग्णावर इलाज करण्याच्या नावाखाली तब्बल नऊ लाख रुपयांचे बिल !
नालासोपारा येथील रिद्धि विनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कोरोनावरील उपचारासाठी विजयकुमार गुप्ता नावाच्या सत्तावन्न वर्षाच्या रुग्णाला दाखल करण्यात आले होते. दुर्दैवाने म्हणा किंवा हॉस्पिटल प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे म्हणा हा रुग्ण दगावला परंतु हॉस्पिटल प्रशासनाने तब्बल ९,६१,७२९/- रुपयांचे बिल त्याच्या नातेवाईकांच्या हातामध्ये देऊन त्यांना अजून एक जोरदार धक्का दिला. रुग्ण दगावला असला तरी हॉस्पिटल व्यवस्थापनाने रुग्णाच्या नातेवाईकांना दमदाटी करत बळजबरीने त्यांच्या कुटुंबियांकडून ८ लाख रुपयांचे बिल अक्षरशः वसूल केले. बिलाचे पैसे भरल्याशिवाय रुग्णाचे प्रेत ताब्यात मिळणार नाही असा पवित्रा हॉस्पिटल व्यवस्थापनाने घेतल्यानंतर रुग्णांच्या नातेवाईकांचा नाईलाज झाला.
कोरोनाबाधित रुग्णावर इलाज करण्याच्या नावाखाली रिद्धी विनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलने कशाप्रकारे रुग्णाची लुटमार केलेली आहे ते या हॉस्पिटलचे बिल पाहून सहज लक्षात येईल.
या बिलांमध्ये समाविष्ट असलेल्या शुल्क आकारणी पैकी इनहाउस मेडिकल मधून रुग्णाला पुरवण्यात आलेल्या औषधे व गोळ्यांची किंमत तब्बल २,५१,१४९ /- इतकी आहे. या लाखो रुपयांच्या औषधांमधील किती औषधं खरोखर रुग्णाच्या शरीरात गेली आणि किती मागच्या दाराने परत मेडिकलमध्ये हा खरोखरच संशोधनाचा विषय ठरावा.
ECMO अर्थात Extracorporeal membrane oxygenation – एक्स्ट्राकोरपोरियल मेंमब्रेन ऑक्सिजिनेशन
या शुल्क आकारणी मधील सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे एक्स्ट्राकोरपोरियल मेंमब्रेन ऑक्सिजिनेशन सुविधा पुरविण्याकरिता आकारण्यात आलेले तब्बल ५,२०,०००/- रुपयांचे शुल्क.
रुग्णाच्या शरीरातील रक्तात शरीराच्या बाहेरून कृत्रिमरीत्या ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी या मशिनचा वापर केला जातो. खासकरून हृदय शस्त्रक्रियेच्या वेळी हृदय आणि फुफ्फुसांना विश्रांती मिळण्यासाठी रुग्णाच्या शरीरात कृत्रिमपणे रक्त व ऑक्सिजनचा पुरवठा करणारी ही यंत्रणा आहे. या यंत्राद्वारे रुग्णाच्या शरीरातील रक्त कृत्रिमपणे शरीराच्या बाहेर काढून त्यामध्ये ऑक्सिजन मिसळून परत रुग्णाच्या शरीरात त्याचा पुरवठा केला जातो. या मशीनमुळे रुग्णाच्या शरीरातील हृदय व फुफ्फुसांना काम करण्यापासून तात्पुरता आराम मिळतो.
रिद्धी विनायक मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये कोरोनावरील उपचाराकरिता दाखल असलेल्या विजयकुमार गुप्ता यांच्या उपचारांमध्ये या ECMO मशीनची गरज का भासली याचे स्पष्टीकरण हॉस्पिटल व्यवस्थापनाकडे भलेही तयार असेल मात्र कोरोनावरील वैद्यकीय उपचारांच्या कसोटीमध्ये हे थातुरमातुर उत्तर टिकणारे नाही आणि या सगळ्या प्रकाराची सखोल तपासणी झाल्यास रिद्धि विनायक मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलचे पितळ उघडे पडणार ही काळया दगडावरची रेघ आहे.
वसईतील तथाकथित टेस्टिंग लॅब कडून कोरोना पेशंटच्या तपासणीमध्ये अक्षम्य अश्या चुका होत असून निगेटिव पेशंटला पॉझिटिव तर पॉझिटिव पेशंटला निगेटिव ठरवताना होणाऱ्या अक्षम्य चुका कोणत्याही परिस्थितीत माफ होऊ शकत नाहीत. खाजगी हॉस्पिटल्सना रुग्णांची लूटमार करण्यासाठी मोकळे रान मिळावे याकरिता हे सर्व जाणीवपूर्वक सुरू असल्याचा संशय हळूहळू बळावत चालला आहे. सरकारी हॉस्पिटल्स आणि त्यात मिळणाऱ्या आरोग्य सुविधांच्या बाबतीत तर वसई-विरारमध्ये सर्वत्र आनंदी आनंदच आहे.
वसई विरार मधल्या खाजगी हॉस्पिटल्सना रग्गड पैसा कमावता यावा म्हणून जाणीवपूर्वक सरकारी इस्पितळांमध्ये अपुऱ्या आणि निकृष्ट प्रतीच्या आरोग्यसुविधा पुरविण्यात येत असल्याच्या दाव्याला पुष्टी मिळणारी परिस्थिती वसई विरार मध्ये यापुढे देखील वारंवार निर्माण होत राहील यात आता काहीच शंका उरलेली नाही.