मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना घरकुल चावीचे वाटप

विभागीय स्तरावर कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना घरकुल चावीचे वाटप

नवी मुंबई, दि. 15: महाआवास योजना अभियान-ग्रामीण अंतर्गत ई गृहप्रवेश कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरुपात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथी गृह येथे घरकुलाच्या चावीचे वाटप करण्यात आले. विभागीयस्तरावर कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थाना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले. कोकण विभाग आणि ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने आयुक्त कार्यालयात हा ई गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथीगृहात झालेल्या ई गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात ठाणे जिल्हयातील पांडू गणपत दरोडा आणि रसिक रवींद्र गायकवाड त्याचबरोबर पालघर जिल्हयातील सोनी संदेश महाले, सुरेश पांडुरंग धिंडा आणि अशोक काशिनाथ घागरे या लाभार्थ्यांना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपायुक्त (प्रशासन) मनोज रानडे, उपायुक्त (विकास) गिरीष भालेराव, सहाय्यक आयुक्त (विकास) मनिषा देवगुणे, उपायुक्त (चौकशी) डी. वाय. जाधव, प्रकल्प संचालक (जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा) छायादेवी शिसोदे, उपस्थित होते.
सर्वांसाठी घरे-2022 हे शासनाचे महत्त्वाचे धोरण असून याअनुषंगाने राज्यात प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत आवास दिनाचे औचित्य साधून राज्यात प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, आदिम विकास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, अटल कामगार बाल आवास योजना ह्या सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजना अधिक गतिमान करण्यासाठी व त्यात गुणवत्ता आणण्यासाठी 20 नोव्हेंबर 2020 ते 5 जून 2021 या कालावधीत महा आवास अभियान-ग्रामीण शासनामार्फत राबविण्यात आले आहेत. या अभियानात कोकण विभागाने दमदार कामगिरी करत लाभार्थ्यांचे पक्क्या घरांचे स्वप्न साकार केले.

यावेळी विभागस्तरावरील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सोमा धर्मा फडके (मु.ढाकणे ता.शहापूर,), रमाई आवास योजनेअंतर्गत सागर नामदेव कांबळे (मु.साठगाव ता.शहापूर), शबरी आवास योजनेअंतर्गत प्रकाश राघो दरोडा (मु.कोठारे ता.शहापूर) आदिम आवास योजने अंतर्गत जनाबाई काशिनाथ भोईर (मु.नांदिठणे ता.भिवंडी.) तसेच जिल्हास्तरावरील ठाणे जिल्हयातील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत श्वेता नामकुडा (मु.वडपे ता.भिवंडी), रमाई आवास योजनेअंतर्गत लखन रमेश कांबळे (मु.कांबे ता.भिवंडी) , शबरी आवास योजनेअंतर्गत पुंडलिक नारायण देसले (मु.बेळवली बुद्रुक ता.शहापूर) या लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते घरकुल चावीचे वाटप करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *