
प्रतिनिधी :
वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती आय हद्दीतील महानगरपालिकेची मालमत्ता असलेल्या एका खोलीच्या नूतनीकरणासाठी ठेकेदार सोहेल खत्री याने लाखो रुपये खर्च केल्याची बाब स्पष्ट झाली असून त्याने एवढा खर्च करण्याचे कारण काय याचा खुलासा होणे आवश्यक आहे.
या बाबतची अधिक माहिती अशी की, वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती आय हद्दीतील सिद्धार्थ नगर, किल्ला बंदर रोड, वसई तहसील कार्यालयासमोर असलेल्या कृष्णा चाळीतील खोली क्र. ७ वर नूतनीकरणासाठी लाखो रुपये खर्च केल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. याबाबत माहिती अधिकार अर्जाद्वारे माहिती मागितली असता मागितलेली माहिती निरंक असे उत्तर महानगरपालिकेकडून देण्यात आले. महानगरपालिकेने नूतनीकरणावर खर्च केला नसेल तर खर्च कोणी केला? याची चौकशी व्हावी. सदर बाबत अधिक चौकशी केली असता ठेकेदार सोहेल खत्री याने हा खर्च केल्याचे उघड झाले आहे. तथापि सदर खोलीच्या नूतनीकरणावर एवढा मोठा खर्च सोहेल खत्री याने कशासाठी केला हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
प्रभाग समिती आय हद्दीतील शासकीय रुग्णालयाच्या मागे महानगरपालिका दवाखान्याकरिता इमारतीचे बांधकाम करीत असून गिरीश गोरखा हे महानगरपालिकेचे एक कर्मचारी मागील कित्येक वर्षांपासून त्या जागेवर रहात आहेत. त्यांच्या अनेक पिढ्या याच जागेवर रहात होत्या असा गिरीश गोरखा यांचा दावा आहे. गिरीश गोरखा यांना तेथून हटविण्याकरिता महानगरपालिका प्रयत्न करीत आहे. त्यांच्याकरिताच कृष्णा चाळीतील खोलीचे नूतनीकरण करण्यात आलेले आहे. कृष्णा चाळीतील खोलीच्या नूतनीकरणासाठी महानगरपालिकेकडून लाखो रुपये खर्च केला आहे. गिरीश गोरखा याने कृष्णा चाळीतील खोलीत जाऊन राहावे याकरिता महानगरपालिका त्याच्यावर दबाव आणत आहे. मात्र त्याला या खोलीचे मालकी करारपत्र लिहून दिले जात नसल्यामुळे गिरीश गोरखा तिथे जाण्यास तयार नाही.
गिरीश गोरखा यांना हटविण्याकरिता कृष्णा चाळीतील खोलीच्या नूतनीकरणासाठी लाखो रुपये बिना टेंडर खर्च करण्यात आलेला आहे. मात्र ही रक्कम महानगरपालिकेने खर्च केलेली नाही. त्यामुळे माहिती निरंक असे उत्तर देण्यात आल्याचे प्रकाश साटम यांनी सांगितले. या प्रकरणात उप अभियंता प्रकाश साटम यांचे नाव समोर आले आहे. महानगरपालिका क्षेत्रात बांधकाम विभागात फार मोठे घोटाळे झालेले आहेत आणि त्यात उप अभियंता प्रकाश साटम यांच्या नावाची चर्चा आहे. सर्व घोटाळे एका मागोमाग एक करून बाहेर काढू.
कृष्णा चाळीतील खोलीच्या नूतनीकरणावर केलेल्या लाखो रुपये खर्चा संदर्भात जाणून घेण्याकरिता माहिती अधिकार अंतर्गत अर्ज केला होता. सदर अर्जाला उत्तर देताना प्रभारी सहाय्यक आयुक्त तथा जन माहिती अधिकारी प्रदीप आवडेकर म्हणतात की, बांधकाम विभागाकडील दस्तावेज तपासले असता सदर बाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे माहिती निरंक आहे.
सदर खोलीच्या नूतनीकरणावर लाखो रुपये खर्च केला कोणी याबाबत पाठपुरावा केल्यानंतर ठेकेदार सोहेल खत्री याने हा खर्च केल्याचे उघड झाले आहे. आता सोहेल खत्री याने लाखो रुपये खर्च करण्याचे कारण काय ते स्पष्ट होणे आवश्यक आहे. सदर प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी रुबिना मुल्ला यांनी केली आहे.