पीडब्ल्यूडी प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे मागील ०५ वर्षांपासून रखडलेला नायगाव पुर्व सोपारा खाडी पूल अद्यापही अपूर्णावस्थेत आहे. संथगतीने कामाची प्रगती, स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, मनपा प्रशासन यांचेमार्फत पुलाच्या कामात वेळोवेळी येणाऱ्या अडचणीबाबत सहकार्य करूनही नविन खाडी पुलाचे काम पूर्ण करणेचे पीडब्लूडीचे कोणतेही उद्दिष्ट दिसून येत नाही.

नायगाव पुर्व पश्चिम उड्डाणपुलाच्या उतार मार्गामुळे खाडी पुलाच्या पूर्वेकडील उतार संरचनेत बदल करण्यात आलेला होता. याकामी वाढीव निधीची गरज लक्षात घेता आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने वसई विरार शहर महानगरपालिकेमार्फत पुलाच्या काम पूर्णत्वासाठी रक्कम रु.०१ करोड ०१ लाख ७४ हजार रक्कमेचा निधी राखीव केला होता. जेणेकरून पुलाचे काम लवकर पूर्ण होऊन नागरिकांची गैरसोय दुर होईल. परंतु दुर्दैवाने मनपामार्फत आवश्यक निधी पीडब्लूडी विभागास वर्ग करूनही कामात आवश्यक गती किंवा काम पूर्णत्वाचे उदिष्ट दिसून येत नाही. नवीन खाडी पुलास रहदारीसाठी तात्पुरत्या स्वरूपात लावण्यात आलेले लोखंडी जिने नागरिकांना त्रासदायक ठरत असल्याने नविन पुलाचे काम युद्धपातळीवर पूर्ण होणे गरजेचे आहे. याकामी मागील ५ वर्षांपासून रितसर पाठपुरावा करण्यात येत आहे.

स्थानिक नगरसेवक तथा सभापती कन्हैया (बेटा) भोईर यांनी पीडब्लूडीचे कार्यकारी अभियंता श्री. बडे व अभियंता श्री. पोपट यांच्याशी चर्चा करत कामाच्या गतीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. पुलाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली असता सद्यस्थितीत खाडीपुलाच्या पूर्वेकडील उतार मार्गाचे काम अंतिम टप्प्यात असून पश्चिमेकडील उतार मार्गाच्या टो वॉलचे काम सुरु आहे. परंतु कामाची गती पाहता पुढील दोन महिन्यापर्यंत काम पूर्ण होण्याची कोणतीही चिन्ह किंवा पीडब्लूडी प्रशासनाची शास्वती दिसून येत नाही. त्यामुळे पावसाळ्यातही नागरिकांना त्रासदायक जिन्यावरुन रहदारी करावी लागणार आहे. यावेळी जिन्याच्या दोन्ही बाजूमध्ये लोखंडी सळ्या अडथळा निर्माण करत असल्याने त्या तात्पुरत्या वाकविण्यात आलेल्या होत्या. परंतु तरीही नागरिकांना त्रास होत असल्याने सदर भाग समक्ष उभे राहून कॉंक्रीटीकरण करण्यात आलेला आहे. तसेच इतर आवश्यक दुरुस्तीकामे पूर्ण करून घेण्याच्या सुचना सभापती कन्हैया भोईर यांचेमार्फत पीडब्लूडी प्रशासनास देण्यात आलेल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *