
चिंचपाड्यातील शुभ इंडस्ट्रियल इस्टेटच्या अनधिकृत पत्राशेड बांधकामावर प्र.सहआयुक्त सुभाष जाधव मेहेरबान
कारवाई तर करत नाहीत, पण लाखोंच्या बेकायदेशीर वसुल्या सुरू; वालीव विभागाचं डोकं ठिकाणावर आहे का?


वसई : (प्रतिनिधी) :
वसई पूर्वेतील वालीव विभाग सध्या अनधिकृत बांधकामांचा अड्डा बनला आहे. याठिकाणी जीतकी अनधिकृत बांधकामं होतात तितकी सगळी अनधिकृत बांधकामं आर्थिक वसुल्यांचा धुर सोडल्याशिवाय पूर्णच होत नाहीत. या महापालिकेच्या वालीव विभागात जो प्र.सहआयुक्त आयुक्तांनी बसवला आहे तो म्हणजे निव्वळ बाहुला झाला आहे. या अधिकार्याला कारवाईसाठी अनेकदा निवेदन देऊनही हा अधिकारी जागचा हलत नाही. आपण सगळे आयुक्तांचे चाकर, महापालिका आम्हाला कस्पटासमान अशा तत्त्वावर वालीव विभागाचा कारभार सध्या बेतला आहे. वसई पूर्वेतील चिंचपाडा येथील शुभ इंडस्ट्रिय इस्टेटच्या मालकाने महापालिकेला धाब्यावर बसवून कंपनीच्या वरील भागात अनधिकृत पत्राशेड बांधकाम केले आहे. या बांधकामाचा खरा बाप प्र.सहआयुक्त सुभाष जाधव हाच आहे. या अधिकार्याने अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याऐवजी त्या अनधिकृत बांधकामांतून लाखो रूपयांच्या वसुल्या करून त्यांचा मलिदा महापालिकेच्या मुख्यालयात जे वरीष्ठ अधिकारी बसले आहेत त्यांच्या खिशापर्यंत वाहता ठेवला आहे.
आयुक्त गंगाथरन डी. यांची बदली झाल्यानंतर वसई-विरार शहर महापालिकेला नवीन आयुक्त अनिल पवार यांच्या रूपाने लाभला आहे. कोरोना काळापासून आणि प्रामुख्याने प्रशासकीय राजवटीत अनधिकृत बांधकामांचे आयुक्त गंगाथरन डी. यांनी जे लाड केले ते लाड थांबवण्याची जबाबदारी नवे आयुक्त अनिल पवार यांची आहे. त्यामुळे या अनधिकृत बांधकामांवर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत सर्वसामान्य कामगारांचा जीव भांड्यात पडणार नाही.
अनधिकृत बांधकामं महापालिकेच्या नियमांना धाब्यावर बसवून माजवायची. त्यांना अभय द्यायचा. कंपनीमालकांकडून लाखो रूपयांचा मलिदा लाटायचा आणि अनधिकृत बांधकामांवर मेहरेबान व्हायचे. यातून अनधिकृत व धोकादायक बांधकामात जीव धोक्यात घालून काम करणार्या शेकडो कामगारांचा जीव धोक्यात आला आहे. चिंचपाड्यातील शुभ इंडस्ट्रियल इस्टेट याठिकाणी अनधिकृत पत्राशेडच्या बांधकामाने केवळ डोकेच बाहेर काढलेले नाही तर या अनधिकृत बांधकामात भविष्यात शेकडो कामगारांचा जीव धोक्यात येण्याचा धोका आहे. प्र.सहआयुक्त सुभाष जाधव यांना हा धोका दिसत नसेल तर या अनधिकृत बांधकामांना पोसण्याचे पाप करताना त्यांनी थोडी लाज बाळगावी आणि काय ती कारवाई कराव, अशी जनतेची मागणी आहे.