
वसई | प्रतिनिधी:- वसई-विरार महापालिकेचे दोन प्रभारी सहाय्यक आयुक्त हरवल्याची जाहीरात करून भाजपाने सोशल मिडीयावर खळबळ उडवून दिली आहे. पालिकेच्या प्रभाग समिती जी चे प्रभारी सहाय्यक आयुक्त सुभाष जाधव आणि प्रभाग समिती आयचे प्रभारी सहाय्यक आयुक्त प्रदीप आवडेकर हे कार्यालयातून हरवले असून कोणाला दिसल्यास नक्की कळवा असे आवाहन भाजपाच्या भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अशोक शेळके आणि अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष तसनिफ शेख यांनी सोशल मिडीयावर केले आहे.हे दोन्ही आयुक्त नागरिक,सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांचेही फोन घेत नाहीत.त्यांच्या कार्यालयातही ते उपलब्ध नसतात.त्यामुळे प्रभागातील विकास कामे आणि नागरिकांची कामे खोळंबली आहेत.त्यामुळे त्यांचा शोध घेण्यासाठी ही मोहिम हाती घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
सुभाष जाधव हे दिवसभर कार्यालयात नसतात,संध्याकाळी सहानंतर ते कार्यालयात येतात.कोणीही फोन केले तर ते उचलत नाहीत.त्यांच्या प्रभागात कोवीडचे वरुण आणि अग्रवाल अशी दोन सेंटर आहेत. तालुक्यात कोवीडचे रुग्ण वाढत चालले आहेत.अशा परिस्थितीत त्यांना शोधायचे कुठे असा प्रश्न अशोक शेळके यांनी उपस्थित केला आहे.सहाय्यक आयुक्तांना भेटण्याची वेळ ३ ते ५ ठेवण्यात आली आहेत.पण जाधव कायम साईटवर असतात.ते कोणत्या साईटवर जावून कोणती कामे करतात.नागरिकांना भेटायला त्यांच्याकडे वेळ का नाही.असाही सवाल शेळके यांनी उपस्थित केला आहे.त्यामुळे या प्रकरणी सुभाष जाधव यांच्याशी संपर्क साधला असता,त्यांनी दोन रिंग वाजल्यानंतर फोन कट केला.तर प्रदीप आवडेकर यांच्याशी संपर्क साधला असात,त्यांचा फोन नॉट रिचेबल असल्याचे दिसून आले.
कोट-जाधव दिवसभर कार्यालयात नसतात,हे सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यावर दिसून येईलच.नागरिकांना भेटायला वेळ नाही.त्यामुळे ते हरवले आहेत,असा बॅनर लावावा लागला.माझा दावा खोटा असेल तर जाधव यांनी नोटीस पाठवावी.किंवा अतिरीक्त आयुक्तांनी सुनावणी लावावी.-अशोक शेळके,प्रदेश सह संयोजक,भाजपा अनधिकृत बांधकामाला पाठीशी घालणार्या कनिष्ठ अभियंता मिलींद शिरसाट यांच्यावर पुरावे देवूनही कारवाई करण्यास आवडेकर टाळाटाळ करतात.अनधिकृत बांधकामाला त्यांनी फक्त एमआरटीपीची नोटीस बजावली,गुन्हा दाखल केला नाही.याप्रकरणी माहिती घेण्यासाठी गेल्यावर ते भेटत नाहीत.बीझी असल्याचे सांगण्यात येते.म्हणून बॅनर लावण्यात आले-तसनिफ शेख,अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष,भाजप