
वसई : (प्रतिनिधी) : मान्सून पर्जन्याने मारलेली दडी आणि उन्हाळ्यापासूनच वसई विरारकरांच्या डोक्यावर असलेल्या पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले आहे. जून महिना संपत आला तरी पावसाचा ठावठिकाणा नसल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. त्यातच वसई विरार शहर महानगरपालिकेला पाणी पुरवठा करणारी पालघर जिल्ह्यातील तीन्ही धरणांतील पाणीसाठा पूर्णपणे खालावला आहे. यातील सूर्या-धामणी धरणात केवळ 18.84 टक्के पाणीसाठा शिल्लक असून तो केवळ 260 दिवस पुरेल इतकाच आहे. तसेच उसगाव धरणात 12.46 टक्के पाणीसाठा शिल्लक असून तो केवळ 28 दिवस पुरेल इतका आहे. तसेच पेल्हार धरणात 8.03 टक्के पाणीसाठा शिल्लक असून तो केवळ 30 दिवस पुरेल इतकाच आहे. येत्या महिनाभरात मुसळधार पाऊस झाला नाही तर वसई विरारकरांवर तिव्र पाणीटंचाईचे संकट ओढवणार असल्याची भिती वर्तविण्यात येत आहे.
वसई विरार शहर महानगरपालिकेची लोकसंख्या 17 लाखांच्या घरात गेली आहे. या मोठ्या नागरिकीकरणाला सूर्या धामणी, उसगाव आणि पेल्हार धरणातून पाणीपुरवठा केला जातो. यंदा मान्सून पर्जन्याने निटशी सुरूवात केली नसल्याने त्याचा मोठा फटका नागरिकांना बसला आहे. ठिकठिकाणी पाणीटंचाईचे सावट गडद झाले असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यात एवढ्या मोठ्या नागरिकीकरणाला पाणीपुरवठा करणार्या धरणांत केवळ नाममात्र पाणीसाठा शिल्लक राहील्याने आता सगळ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.

सूर्या धामणी धरण
वसई विरारकरांची तहान भागवणारे सूर्या धामणी धरण हे मुख्य धरण असून या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 276 दशलक्ष घनमिटर इतकी आहे. सध्या 52.015 दशलक्ष घनमिटर म्हणजेच 18.84 टक्के पाणीसाठा शिल्लक असून तो केवळ 260 दिवस पुरेल इतकाच आहे.

उसगाव धरण
वसई विरार शहर महापालिकेला पाणीपुरवठा करणारं वसई तालुक्यातील हे महत्वाचं धरण असून या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 4.96 दशलक्ष घनमिटर इतकी आहे. सध्या या धरणात 0.618 दशलक्ष घनमीटर म्हणजेच 12.46 टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक असून तो केवळ 28 दिवस पुरेल इतकाच आहे.

पेल्हार धरण
नालासोपारा पूर्वेतील पेल्हार येथील पेल्हार धरण हे पालिकेला पाणीपुरवठा करनारे क्रमांक दोनचे धरण आहे. या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 3.56 दशलक्ष घनमिटर इतकी आहे. सध्या या धरणात 0.287 दशलक्ष घनमिटर म्हणजेच 8.03 टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक असून तो 30 दिवस पुरेल इतका आहे.
येत्या महिनाभरात पावसाने चांगली कृपादृष्टी न ठेवल्यास वसई विरारकरांवर तिव्र पाणीटंचाईचे सावट पसरल्याशिवाय राहणार नाही, अशी चिंता व्यक्त होत आहे.