वसई :
वसई–विरार शहर महानगरपालिकेच्या कारभारावर थेट लक्ष केंद्रित करत मंगळवार, १० फेब्रुवारी रोजी महापौर मा. अजीव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मनपा मुख्यालयात आढावा बैठक पार पडली. या बैठकीत महापौरांनी विविध विभागांच्या कामकाजाचा खडसून जाब घेतला, तर बैठकीनंतर स्वच्छता दूतांना स्मार्ट वॉचचे वितरण करून कामावर थेट नियंत्रणाची दिशा स्पष्ट केली.
स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, आरोग्य, पाणीपुरवठा आदी विभागांच्या कामात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा महापौरांनी दिला. शहर स्वच्छतेच्या नावाखाली चालणाऱ्या केवळ कागदी कामगिरीवर आता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लगाम घालण्यात येणार असल्याचे त्यांनी सूचित केले.
या बैठकीला माजी महापौर प्रवीण शेट्टी, उपमहापौर मार्शल लोपीस, आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे व दिपक सावंत, नगरसेवक प्रफुल्ल साने यांच्यासह विविध उपायुक्त, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकाऱ्यांना वेळेत काम पूर्ण न झाल्यास जबाबदारी निश्चित केली जाईल, असेही यावेळी सांगण्यात आले.
स्वच्छता दूतांना देण्यात आलेल्या स्मार्ट वॉचमुळे कामाचे वेळापत्रक, उपस्थिती व प्रत्यक्ष कार्यवाहीवर नजर ठेवता येणार असून, यामुळे मनपाच्या स्वच्छता यंत्रणेत शिस्त आणि पारदर्शकता येईल, असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला.
महापौरांच्या या आक्रमक भूमिकेमुळे मनपातील काही विभागांची धाकधूक वाढली असून, शहराच्या कारभारात बदलाचे संकेत मिळत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *