
जिल्हा मुख्यालय सुरू होऊन वर्षभर झाले असताना सुद्धा प्रशासकीय इमारत ‘ब’ चे बांधकाम पूर्ण झाले नव्हते त्यामुळे जिल्हास्तरीय 24 कार्यालय इतरत्र कार्यरत होती अखेर या इमारतीस भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झाले असल्याने महिन्याभरात सर्व कार्यालय सुरू होणार असल्याचे बोलले जात आहे.
वरील 24 कार्यालये एकाच छताखाली सुरू होणार असल्याने जिल्हाभरातून विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांची ससेहोलपट थांबणार आहे. वरील सर्व कार्यालय पालघर शहरात विविध ठिकाणी भाड्याच्या जागेत असल्याने कार्यालय शोधण्यासाठी नागरिकांची फार गैरसोय होत होती. या इमारतीत ही कार्यालय सुरू होणार असल्याने सर्व कार्यालयांनी आपापले दस्तऐवज व इतर वस्तू या इमारतीत आणण्यास सुरुवात केल्याने या महिन्याभरामध्ये ही कार्यालय सुरू होतील. असे बोलले जात आहे. यामुळे कार्यालय शोधण्यासाठी नागरिकांची होणारी तारांबळ थांबणार आहे.
दरम्यान प्रशासकीय ब इमारतीच्या उभारण्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू होते. तसेच या इमारतीमध्ये फॉल सीलिंगचे काम ऑगस्ट अखेर पर्यंत सुरु राहिले. त्याचबरोबर विद्युत जोडणी करण्याचे काम विलंबाने झाल्याचे दिसून आले आहे. 8 ऑगस्ट रोजी या इमारतीला सिडको ने भोगवटा प्रमाणपत्र दिले असून या इमारतीत सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालय सुरू झाले आहे. या इमारतीमध्ये आपली आस्थापने सुरू करावी अशा सुचना जिल्हा प्रशासनाने संबंधित विभागांना दिल्या आहेत.
सप्टेंबर 2021 पासून जिल्हा मुख्यालय संकुलातील जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय तसेच पोलीस अधीक्षक कार्यालय कार्यरत झाल्यानंतर प्रथम 2021 वर्षाखेरीपर्यंत व नंतर जानेवारीपर्यंत प्रशासकीय इमारती सुरू करण्याचे सिडको तर्फे आश्वासन देण्यात आले होते. त्यानंतर प्रशासकीय इमारत “अ” चे भोगवटा प्रमाणपत्र 31 जानेवारी रोजी देण्यात आल्यानंतर प्रत्यक्षात अंतर्गत काम व विद्युत जोडणीला विलंब झाल्याने या इमारतीतील कार्यालय एप्रिल महिन्यात सुरू झाली होती. प्रशासकीय “ब” इमारतीमधील 24 कार्यालय लवकरच कार्यरत होती असे जिल्हाधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले.
प्रशासकीय व कार्यालयातील आस्थापने
सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालय, पोलीस उप अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंध विभाग, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, सहाय्यक संचालक नगर रचना, जिल्हा कोषागार कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, संशोधन अधिकारी जिल्हा जात पडताळणी समिती, उपप्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी, उपवन संरक्षक (डहाणू), सामाजिक वनीकरण विभाग, सहसंचालक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, जिल्हा जलसंधारण अधिकारी (मृद व जलसंधारण विभाग), सहाय्यक नियंत्रक वैद्यमापनशास्त्र, जिल्हा क्षयरोग अधिकारी, जिल्हा हिवताप कार्यालय, लेखाधिकारी वेतन पडताळणी पथक, दुय्यम निबंधक कार्यालय (१ व २), कृषी क्षेत्र अधीक्षक पशुपैदास व संगोपन केंद्र व विद्युत निरीक्षक