
मराठी साहित्य जगाच्या वेशीवर आपले स्थान निर्माण करत आहे. साहित्य संस्कृती व वाचन संस्कृती वाढविण्यासाठी सर्वांनीच विशेष प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रतिपादित केले. कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सहाव्या राज्यस्तरीय महिला संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके नगरी उभारलेल्या सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात या संमेलनाचे उद्घाटन त्यांनी केले. त्यावेळी त्या बोलत होत्या. राजकारणाप्रमाणे साहित्यामध्ये भेद होऊ नयेत, अशी इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली. स्त्री पुरुष समानता निर्देशांक यामध्ये आपण खूप खाली आहोत. तो वाढवण्यासाठी ही विषमता घालवण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. महिला म्हणून व्यक्त होताना महिलांवर अनेकदा टीकाटिप्पणी केली जाते. त्यांना टोळभैरव अशे शब्द वापरून त्यांची उपहासात्मक टीका उपसभापती गोऱ्हे यांनी केली. कोणी काही बोलो, महिलांनी आपले काम करत राहिले पाहिजे व त्यासाठी पुरुषांनीही त्यांना साथ देणे आवश्यक असल्याचे त्यांनी येथे सांगितले. समाजाचे सामर्थ्य वाढवण्यासाठी प्रयत्न करा, कोणतेही प्रेम असो ती हिंसा मुक्त व त्या प्रेमामध्ये अंधश्रद्धा नसावी असे शेवटी बोलताना त्यांनी सांगितले.यावेळी दोन दिवसीय संमेलनाच्या अध्यक्ष मौज प्रकाशनाच्या संपादिका, साहित्यिका मोनिका राजेंद्रगडकर होत्या. यावेळी प्रमुख अतिथी अभिनेत्री मधुरा वेलणकर, स्वागताध्यक्ष महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष ज्योती ठाकरे होत्या. तसेच जिल्हापरिषद अध्यक्षा वैधही वाढण, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्ष नमिता कीर, विश्वस्त रेखा नार्वेकर, महिला साहित्य संमेलन समिती प्रमुख उषा परब आणि नियामक मंडळ सदस्य शोभा सावंत, नियोजन आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. भालचंद्र मुणगेकर, कोमसापचे संस्थापक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक, साहित्यिक रमेश किर, कार्याध्यक्ष प्रदीप धवल इ.मान्यवर उपस्थित होते.
‘महिलांचे साहित्य किती पुरुष लेखक वाचतात व त्याची दखल घेतात? ‘
असा प्रश्न उपस्थित करत महिला लेखिकांचे साहित्य पूर्वग्रह व संकुचित दृष्टिकोनातून पाहिले जात असून महिलांना आपल्या स्वतःशी व काळोखाशी लढाई करावे लागत आहे. पेच व त्राण सहन करणाऱ्या महिलांचे साहित्य सार्वत्रिक दृष्टीकोनातून पाहणे गरजेचे असून महिलांनी लिखाणात प्रयोगशीलता अवलंबायला हवी असे ज्येष्ठ साहित्यिका व संपादिका मोनिका गजेंद्रगडकर यांनी सोनोपंत दांडेकर महाविद्यालय पालघर येथे होणाऱ्या महिला साहित्य संमेलनात प्रतिपादन केले.
कोकण मराठी साहित्य परिषदेचे सहावे राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलन पालघर येथे आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाध्यक्षपदी उपस्थित असलेल्या मोनिका गजेंद्रगडकर यांनी स्त्री साहित्याचा मागोवा आपल्या भाषणातून घेतला व उपस्थित महिलांशी संवाद साधला. स्त्रियांच्या स्वातंत्र्याला सन्मानाची जोड दयायला हवी असे सांगत टीव्ही मालिकांमध्ये स्त्री पात्रांना दुय्यम पद्धतीने वागवले जात असताना देखील आपण अशा मालिका आवडीने पाहतो या असे मोनिका गजेंद्रगडकर यांनी खेदाने नमूद केले.
उषा परब यांनी संमेलनाचे प्रास्ताविक करीत साहित्य दिंडी तळागाळापर्यंत पोहचली पाहिजे असा कोमसापचा आग्रह असल्याचे सांगितले. ग्रामीण भागातील स्त्रिया शहरात कमी जातात म्हणून संमेलन दारी आणण्याचा प्रयत्न महिला संमेलनाने केला आहे. असे सांगून महिला संमेलन सीमोल्लंघन करेल अशी आशा व्यक्त केली .याप्रसंगी उद्घाटक म्हणून विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे तर प्रमुख अतिथी म्हणून अभिनेत्री-लेखिका मधुरा वेलणकर-साटम उपस्थित होत्या. उपस्थितांचे स्वागत स्वागताध्यक्ष ज्योती ठाकरे यांनी केले. वटवृक्षाच्या झाडाखाली गवत देखील उगवत नाही पण मधुभाईंसारख्या वटवृक्षाखाली अनेक साहित्यिक तयार झाले आहेत असे सांगून मधुभाई बद्दलचा आदर भाव व्यक्त केला. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्ष नमिता कीर यांनी प्रास्ताविकामध्ये महिला साहित्य संमेलनाची गरज याविषयी भूमिका मांडली. संवादाचे पूल तयार होणे गरजेचे आहे असे सांगून प्रत्येक व्यक्ती इथल्या विचारांचे सत्व घेऊन जाणार आहे असा आशावाद व्यक्त केला.
महिलांचे साहित्य कमी प्रमाणात वाचले जात असल्याचे निदर्शनास आणून हे प्रमाण वाढविण्याची गरज असल्याचे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. महिलेला सहजपणे साहित्य निर्मिती करण्यासाठी पोषक वातावरण तयार करायला हवे तसेच ग्रामीण भागातील महिलांमध्ये साहित्यिक चळवळ राबवण्यासाठी महिलांसाठी चर्चासत्र, बचत गटांच्या माध्यमातून वाचनालय इत्यादी उपक्रम राबवणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. स्त्रियांना लिखाणासाठी वेळ मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागतो त्यांना त्याची सर्जनशीलता जपणे कठीण जाते हे वास्तव आहे. मनाची एकाग्रता भंग झाल्यानंतर देखील सर्जनशील लिखाण करण्याची ताकत महिलांमध्ये असल्याचे सांगत महिलांना समाजामध्ये निर्भयतेने वावरता आले तर अधिक प्रमाणात साहित्य निर्मिती होईल. असे डॉ. गोऱ्हे पुढे म्हणाल्या.
लहानपणापासून चौकटीत राहणाऱ्या महिला वर्गाने पुढील पिढी बदलावी म्हणून जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत असे सांगत मधुरा वेलणकर यांनी आपण पुढच्या पिढीला माणूस म्हणून वाढवायला हवे व जागवायला व्हायला हवे असे सांगितले. वास्तव उभे करण्यासाठी नाटकात ताकद उभी करावी लागते त्याचप्रमाणे लिखाणातील ताकतीने साहित्यिक वाचकांसमोर त्यांच्या मनातील चित्र उभे करीत असतो. सक्षम लिखाण करण्यासाठी वाचन महत्त्वपूर्ण असल्याचे सांगून महिलांचे सक्षमीकरण होणे गरजेचे असल्याचे मधुरा वेलणकर यांनी पुढे सांगितले.
महिलांचे साहित्य संमेलन म्हणजे हा पुरुष वर्गाच्या विरोधातील कोणता उपक्रम नसून, पुरुषांच्या सहकार्यानेच त्यांच्या सोबत पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न आहे. हे काम करतानाच सर्वच घटकांना प्रोत्साहन देण्याचे कार्य कोमसाप करीत आहे. साहित्यात काही शब्द मांडत जातात, तर काहींचे शब्द सांडत राहतात. सांडलेल्या शब्दांचे मानकरी शोधून, अश्या लेखकांना व्यासपीठ देण्याचे काम या संस्थेद्वारा सतत सुरु आहे. अखिल भारतीय साहित्य संमेल्नांची ज्येष्ठाच्या अध्यक्षीय निवडीची परंपरा मोढून आम्ही मोहिनी गजेंद्रगडकर याच्या रूपाने पन्नाशीच्या वयोगटातील अध्यक्ष निवडल्या आहेत असे संमेलनाच्या स्वागतध्यक्ष ज्योती ठाकरे यांनी म्हटले.
संमेलनाच्या उदघाटन कार्यक्रमात जिल्ह्यातील कर्तृत्ववान महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या प्रसंगी समरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. मधुरा वेलणकर यांच्या मधुररव या ग्रंथाचे व ज्योती ठाकरे यांच्या मध्यावर या कवितासंग्रहाचे नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रकाशन झाले.
महिलांचा सत्कार
या साहित्य संमेलनात राज्यातील नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सक्रिय कार्यकर्त्या डहाणू येथील वीणा माच्छी, पत्रकार निखिला म्हात्रे, धाडसी महिला पत्रकार पुरस्कार विजेत्या शितल करदेकर, सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा संतोष पाटील, ग्रामीण अर्थकारणात महिलांच्या सहभागासाठी गोदावरी अर्बन बँकेची स्थापना करून त्याच्या पाच राज्यांमध्ये शाखा उभारणाऱ्या राजश्री पाटील, कष्टकरी संघटनेच्या मधुबाई धोडी, शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या दीप एज्युकेशनच्या दीपा संखे यांचा समावेश आहे.