
प्रतिनिधी,दि.14 फेब्रुवारी
पालघर जिल्ह्यातील शेकडो माथाडी कामगारांवर झालेल्या अन्यायाविरुद्ध आक्रोश व्यक्त करत जिल्हाधिकारी कार्यालयावर आमरण साखळी उपोषण सुरू केले आहे. शेकडो माथाडी कामगारांनी काम बंद करून आपल्या विविध मागण्यांसाठी हे आमरण साखळी आंदोलन आज पासून सुरू केले आहे.
फुड कॉर्पोरेशन इंडिया यांच्या धान्य गोडाऊन मधून सरकारी धान्य पूर्वी तालुक्याच्या गोडाउन मध्ये येत होते. अलीकडेच सरकारच्या नव्या धोरणानुसार हे धान्य तालुक्याच्या ठिकाणी न पाठवता थेट रेशनिंग दुकानांवर पाठवण्यात येत आहे.यामुळे तालुका गोडाऊन वर काम करणाऱ्या माथाडी कामगारांवर उपासमारीची वेळ आली होती. मोठ्या प्रमाणात कामे कमी झाल्यामुळे कामगारांच्या अडचणी मध्ये मोठी वाढ झाली हे लक्षात घेत माथाडी कामगाराच्या अखिल भारतीय माथाडी सुरक्षारक्षक श्रमजीवी आणि जनरल कामगार युनियन मार्फत अनेक वेळा पत्रव्यवहार केले गेले.या पत्रव्यवहारांची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाच्या किराणा बाजार व दुकाने मंडळ मुंबई मार्फत पालघर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना पत्र पाठवून धान्य वितरण प्रणालीशी संबंधित माथाडी स्वरूपाची कामे जिल्ह्यातील माथाडी कामगारांना कडूनच करून घ्यावे असे पत्रववहार केले असतानाही ही कामे या कामगारांना मिळत नाही याचा आक्रोश व्यक्त करत कामगारांनी एकत्रित येत आंदोलनाचा मार्ग पत्करला आहे.
वाहतूक ठेकेदार याला 2014 पासून मुदतवाढ देण्यात येत आहे. ठेकेदार स्वतःच्या चोर्या लपवण्यासाठी माथाडी कामगार नसलेल्या इतर कामगारांना कामावर ठेवत आहे व नोंदणीकृत माथाडी कामगारांवर अन्याय होत आहे. या पार्श्वभूमीवर या ठेकेदाराने नोंदणीकृत कामगारांना कामावर घ्यावे अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाकडे केली आहे. याचबरोबरीने कामगारांच्या आधारभूत भत्ता वाढीसाठीही मंजुरी देण्यात आली असली तरी त्याचा लाभ माथाडी कामगारांना मिळत नाही शासकीय दर पत्रकाप्रमाणे दरवाढ मिळालेला भत्ता देण्यात यावा अशी मागणी या कामगारांनी येथे केली आहे माथाडी कामगार हा आर्थिक दृष्ट्या दुर्बल व मेहनत करणारा आहे त्याच्या समस्या लक्षात घेत प्रशासनाने तातडीने त्यांच्या मागण्यांकडे विचार करून त्यांच्या प्रश्न सोडवावा याच बरोबरीने त्याची उपासमारी सोडवावी या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन सुरू आहे. प्रशासन जोवर आमच्या मागण्या पूर्ण करत नाही तोवर हे आंदोलन सुरूच राहणार आहे असे माथाडी कामगार संघटनेचे मागणी आहे.
माथाडी कामगारांचे काम कमी झाल्यामुळे त्यांच्यावर संकटे कोसळणार आहेत. शासनाने वितरण प्रणालीतील कामे देण्यासाठी पत्रव्यवहार केल्यानंतरही त्याची अंमलबजावणी होत नाही. कामगारांच्या अनेक मागण्यांसाठी, त्यांचे हक्क मिळवण्यासाठी आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. शासनाने या मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा.
अरुण रांजणे, सरचिटणीस, अखिल भारतीय माथाडी सुरक्षारक्षक श्रमजीवी आणि जनरल कामगार युनियन