

नायगाव (स्नेहा जावळे)-लोकनेते, आमदार सन्मा. श्री. हितेंद्रजी ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली माजी सभापती तथा स्थानिक नगरसेवक श्री. कन्हैया (बेटा) भोईर यांच्या पुढाकाराने वसई विरार शहर महानगरपालिका मा. आयुक्त, वैद्यकीय आरोग्य विभाग व मित्तल क्लब हाउसचे मालक श्री. मित्तल बिल्डर्स यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यानुसार लवकरच नायगाव पूर्व कॉलनी विभाग मित्तल क्लब हाऊस येथे कोरोना लसीकरण केंद्र सुरु करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक प्रक्रीया अंतीम टप्प्यात आहे.
नायगाव पूर्वेतील कोरोना रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. सध्या नायगाव पूर्वेत जुचंद्र येथे एकमेव लसीकरण केंद्र (सोमवार, बुधवार, शुक्रवार या दिवशी २०० लसी प्रतिदिन) असल्याने नायगाव पूर्व कॉलनी वासियांची मोठी गैरसोय होत होती. लसीकरणासाठी नागरिकांना नायगाव पूर्व कॉलनी ते स्टेशन व स्टेशन ते जुचंद्र असा दुहेरी प्रवास करावा लागत आहे. तासनतास रांगेत उभे रहावे लागत होते.
नायगाव पूर्व कॉलनी वासियांची गैरसोय लक्षात घेता मित्तल क्लब हाऊस येथे लसीकरण केंद्र सुरु करणेबाबत पाठपुरावा सुरु होता. सदर पाठपुराव्यास यश लाभले असून आवश्यक प्रक्रिया पार पाडल्यानंतर लवकरच लसीकरणास सुरुवात करण्यात येणार आहे. ज्याचा फायदा प्रत्येक नायगाव पूर्व कॉलनी वासियांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना होणार आहे.