

माननीय शिवसेनाप्रमुखांनी वसई-विरार नालासोपारा येथे भगवा फडकला पाहिजे अशी इच्छा व्यक्त केली होती. तुमच्या सहकार्याने आपण त्यांची ही इच्छा पूर्ण करू, असा मानस नालासोपारातील लढाईत उतरलेले प्रदीप शर्मा यांनी रविवारी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात व्यक्त करताच त्यांच्या या संकल्पाला दणदणीत घोषणा आणि जल्लोषाचे उत्स्फूर्त पाठबळ मिळाले. तत्पूर्वी विरार नालासोपारात मोठ्या मिरवणुकीसह शर्मा यांनी धडाकेबाज प्रवेश केला. नालासोपाऱ्यातील जलमय रस्त्यांवर पायी फिरून त्यांनी रहिवाशांची संवादही साधला.
तुमच्या समस्या आता माझ्या समस्या, हे सगळे प्रश्न आपण हळूहळू सोडवू, परिस्थिती बदलवूच, असा विश्वास त्यांनी शिवसैनिकांना दिला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथील समस्यांचा बिमोड करण्यासाठी, दादागिरी मोडून काढण्यासाठी येथे पाठवले आहे. आता मी येथून हलणार नाही. माझा मुक्काम येथेच असणार आहे. दाऊदला आम्ही मुंबई सोडायला लावली. आता इथे आलोय, तेव्हा जो दादागिरी करेल तो विरार नालासोपारा सोडेल, असा इशारा त्यांनी संवाद मेळाव्यात देताच उपस्थितांनी समर्थनाचा एकच गजर केला.
मुसळधार पाऊस आहे, येऊ नका, असे मला काहीजणांनी सकाळी कळवले होते. पण याच समस्या तर मला दूर करायच्या आहेत. इथल्या जनतेचे जीणे सुसह्य, सुंदर करायचे आहे. म्हणून मी भर पावसात आलो. पाण्यात उतरलो, लोकांचे हाल पाहिले. हे चित्र शिवसेना नक्की बदलेल, अशी ग्वाही शर्मा यांनी दिली.
नालासोपारा येथे झालेल्या या संवाद सभेत पालघर जिल्हा संपर्क प्रमुख आमदार रवींद्र फाटक, जिल्हाध्यक्ष वसंत चव्हाण, माजी जिल्हाध्यक्ष शिरीष चव्हाण, दिलिप पिंपळे, नवीन दुबे, नगरसेवक किरण चेंदवणकर, स्वप्नील बांदेकर, मनिष वैद्य, प्रमोद दळवी, गणेश भायदे यांच्यासह महिला आघाडी, युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शर्मा यांना तुमच्या हवाली केलं आहे. ते इथेच राहाणार आहेत. आता काम आणि मतदानही तुम्हीच करायचं. लोकसभेपेक्षा दुप्पट मताधिक्य मिळवून उद्धवजींना ही सीटही मिळवून देऊ, अशा शब्दांत आमदार रवींद्र फाटक यांनी शिवसैनिकांना प्रोत्साहित केले.
चंदनसार येथे आगरी सेनेकडून जोरदार स्वागत
शिवसेनाप्रमुखांच्या स्मारक स्थळी वंदन करून विरारच्या दिशेने निघालेल्या शर्मा यांच्या ताफ्यात सहभागी होण्यासाठी ठिकठिकाणी शिवसैनिक, पदाधिकारी थांबले होते. विरार फाट्यावरून आत वळलेल्या या ताफ्याला चंदनसार येथे आगरी सेनेचे नेते जनार्दन पाटील सामोरे आले. येथेही प्रचंड गर्दी शर्मा यांच्या स्वागतासाठी जमा झाली होती. सर्वत्र भगव्या झेंड्यांचा माहोल होता. पाटील यांचा सत्कार स्वीकारण्यासाठी शर्मा पायउतार होताच फटाक्यांचा एकच धूमधडाका झाला. तुतारी, पुष्पवृष्टी करून शर्मा यांचे स्वागत करण्यात आले. मोठ्या मताधिक्याने तुमचा विजय नक्की आहे शर्मासाहेब. हितेंद्र ठाकूर यांनी आम्हाला फार नाडलं, लुबाडलं आहे, अशा भावना पाटील यांनी व्यक्त केल्या.
पोलीस आला, चोर पळाला!
मिरवणुकीत आणि नंतरच्या संवाद मेळाव्यात घोषणांचा गजर उत्साही कार्यकर्त्यांनी सुरू ठेवला होता. पोलीस आला, पोलीस आला, चोर पळाला, चोर पळाला! ही घोषणा प्रचंड उत्साहात देण्यात येत होती.