

कर्मचाऱ्यांची कामाच्या ठिकाणी निवास व्यवस्था करण्याच्या मागणीला जोर
(विरार)- संपूर्ण राज्यामध्येकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे.वसई विरार मध्येही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढण्यास सुरवात झाली आहे.वसई-विरार शहरात वाढत असलेले कोरोनाचे रुग्ण हे मुंबईतील रुग्णालय, हॉटेल्स आणि अत्यावश्यक सेवेत काम करणारे आहेत, असे निदर्शनास आले आहे.मुंबई शहरामध्ये अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या या कर्मचाऱ्यांना मुंबईतील पॉजिटीव्ह व्यक्तींच्या संपर्कात आल्याने मोठ्या प्रमाणामध्ये लागण झालेली आहे.शिवाय या कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली असून त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना धोका वाढलेला आहे. वसई विरार मध्ये सुरवातीला कोरोनाबाधितांची संख्या अगदीच नगण्य होती. त्यानंतर मात्र ज्या वेगाने येथील कोरोना रुग्णांच्या आकडा वाढत गेला ते पाहता चिंता व्यक्त होऊ लागली आहे. वसई विरार मध्ये आतपर्यंत १३६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तसेच यातील १० रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. १३६ पैकी ६७ रुग्ण हे वसईतून मुंबईत अत्यावश्यक सेवा बजावणारे कर्मचारी आहेत. त्यामुळे ‘कोरोना’ रोखण्यासाठी मुंबई सारख्या हॉटस्पॉट क्षेत्रात जीवाची जोखीम पत्करून अत्यावश्यक सेवेचे कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांची कामाच्या ठिकाणाजवळ तात्पुरती निवास व्यवस्था करावी अशी मागणी आता पुढे येत आहे.
मुंबई हे कोरोनाचे प्रमुख केंद्र बनले आहे. या आजारावर मात करण्यासाठी वसई विरार पालिका क्षेत्रातील डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस अधिकारी/कर्मचारी, महसूल अधिकारी, मुंबई महापालिकेतील कर्मचारी दररोज मुंबई शहरात ये-जा करीत आहेत.अंदाजे ३००० हजार कर्मचारी येथून मुंबईत अत्यावश्यक सेवेसाठी जात आहेत.
यासाठी बेस्टने ६०-७० बसेसची विशेष व्यवस्थादेखील केली आहे.या कर्मचाऱ्यांना आपले कर्तव्य बजावून पुन्हा वसई विरार मध्ये यावे लागत आहे. त्यातून कोरोनाची लागण झाल्यास संपूर्ण कुटुंबाच्या जीवाला धोका उद्भवत आहे. त्यामुळे राज्य सरकारने मुंबई सारख्या हॉट स्पॉट क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची सेवेच्या ठिकाणाजवळच तात्पुरती निवास व्यवस्था करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. परिणामी कोरोनाचा संसर्ग टळण्याबरोबरच कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्याला धोका उद्भवणार नाही.शिवाय मुंबईत अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या या कर्मचारी वर्गास ते राहतात त्या इमारतीत, सोसायटीत, गावात तसेच आसपासच्या परिसरात नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना देखील विलगीकारण सारख्या प्रसंगाला सामोरे जावे लागत आहे. या कर्मचाऱ्यांना कोरोनाविरोधात लढताना समाजाच्या बुरसटलेल्या विचारांचा सामना करावा लागत असून एकप्रकारे तारेवरची कसरत करावी लागत आहे.या सर्व बाबींचा सारासार विचार करून शासनाने या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून विषाणूचे जे वहन होत आहे. त्या धोक्याकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे. परिणामी मुंबईत सेवा बजावणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची रोज वाहतूक करण्याऐवजी सदर कर्मचाऱ्यांना मुंबईत राहण्याची सोय उपलब्ध करून दिल्यास कोरोना विषाणूचा संसर्ग एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होणार नाही
आ. क्षितिज ठाकूर यांचे मुख्यमंत्र्यांना उद्धव ठाकरे यांना निवेदन –
दरम्यान क्षितिज ठाकूर यांनी दैनिक महासागरकडे बोलताना सांगितले की वसई विरार पालिकेने देखील पालिका क्षेत्रात अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या अधिकारी व कर्मचारी वर्गाची पालिका क्षेत्रातच राहण्याची व्यवस्था केली आहे. याच धर्तीवर मुंबई पालिकेने देखील अत्यावश्यक सेवेतील अधिकारी,कर्मचारी यांची राहण्याची व्यवस्था मुंबई शहरातच करण्याची मागणी ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ११ एप्रिल रोजी एका निवेदनाद्वारे केली आहे.विशेष करून महिला अधिकारी, डॉक्टर्स कर्मचारी यांची प्रथम प्राधान्याने ज्या ठिकाणी त्या कार्यरत आहेत तेथून जवळपासच्या भागात असलेल्या शाळा, कॉलेज अश्या ठिकाणी निवासाची व्यवस्था करण्याची यावी .जेणेकरून त्यांचे जाणे-येणे सोपे होऊन या कर्मचाऱ्यांना कोणत्याही ताणतणाव विरहित रुग्णांवर आपली सेवा देणे सोपे होईल असे ठाकूर म्हणाले.आतापर्यंत वसई विरार परिसरात कोरोनाग्रस्थांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून यातील बहुतांश रुग्ण हे मुंबईत अत्यावश्यक सेवा बजावत असलेले असल्याचे निदर्शनास आले आहे.त्यामुळे वेळीच उपाययोजना करून या अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या अधिकारी व कर्मचारी वर्गाची पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे असल्याचे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले होते. परंतु अजूनपर्यंत शासनाकडून कोणतीही उपाययोजना न झाल्याने वसई विरार वासीयांच्या चिंतेत भर पडली आहे.