दोन जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचे जनजीवन अस्ताव्यस्त झाले. मुंबापुरीची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी उपनगरी रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याने लाखो मुंबईकर आपल्या कामावर पोचू शकले नाहीत. रेल्वे रूळांवर व रस्त्यांंवर ठिकठिकाणी गुडघाभर ते कमरेइतके पावसाचे पाणी साचल्यामुळे मुंबईला मोठ्या तलावाचे स्वरूप आले होते. मुंबई कधी झोपत नाही, असे म्हटले जाते. कितीही संकटे आली तरी आपल्या कामावर पोचायचे ही मुंबईकरांच्या रोमारामात भिनलेली संस्कृती आहे. मुंबईच्या लोकल्समधून रोज 85 लाख प्रवास करतात नि बेस्ट बसेसमधून तीस लाखावर प्रवासी असतात. शिवाय स्वतःच्या मोटारीने , टू व्हीलरने किंवा अगदी रिक्षा, टॅक्सी, ओला- उबरने प्रवास कऱणारे हजारो आहेत. दोन जुलैला मुंबईकर अक्षरशः हतबल झाले होते. घरातून बाहेर पडलो तरी जाणार कसे व कुठे असा प्रश्‍न होता. जे रेल्वे स्टेशनवर गेले ते फसले. आपल्याला कोणीच वाली नाही का, अशी अवस्था मुंबईकरांची झाली होती. चोवीस तासात चारशे मिमी कोसळलेल्या पावसाने मुंबईवर अक्षरशः जलात्कार केला. सांगता येत नाही आणि सहन होत नाही अशा यातना मुंबईकरांनी त्या दिवशी सहन केल्या. गरज नसेल तर घरातून बाहेर पडू नका, असे आवाहन करून प्रशासनाने आपले कर्तव्य पार पाडले असेल पण रोज कल्याण, कसारा, कर्जत किंवा वसई, विरार, वाशी, पनवेलवरून जे लाखो चाकरमानी गर्दीने खचाखच भरलेल्या लोकल्सममधून कामावर जातात ते काय त्यांचा वेळ जात नाही म्हणन प्रवास करतात? घरातून बाहेर पडू नका, असे सांगण्याची प्रशासनावर पाळी येते हेच मोठे महापालिका, रेल्वे व राज्य सरकारचे अपयश आहे, असे म्हणावे लागेल.
आज मुंबईला झोपडपट्टयांचा विळखा आहे. दिड कोटीच्या महामुंबईत साठ- सत्तर लाख लोक झोपडपट्टीत राहात असावेत. 1976 मधे प्रभाकर कुंटे हे गृहनिर्माण राज्यमंत्री असताना मुंबईतील झोपडपट्टयांची जनगणना झाली होती, तेव्हा अठरा लाख लोक तेथे राहात होते. मग ही संख्या सत्तर- पंचाहत्तर लाखावर कशी गेली? एकीकडे कॉंक्रीटच्या उत्तुंग इमारती व दुसरीकडे झोपडपट्टयांचा फास अशी मुंबईची अवस्था आहे. पावसाच्या पाण्याच्या निचरा होण्यास किंवा ते पाणी वाहून जाणारे मार्गच कमी झाले आहेत. बिल्डरांना खूश करण्यासाठी सरकारने 4 एफएसआय दिला. त्याचा परिणाम मुंबईत सर्वत्र पचंवीस, तीस मजली टॉवर्स दिसू लागले. बांधकाम कंत्राटदारांनी पाणी कसे वाहून जाणार याची पर्वा न करता टॉवर्स उभारले. अतिक्रमणे, बेकायदेशीर बांधकामे यावर तर कोणाचे नियंत्रण नाही. मुंबईतील नाले म्हणजे घाणीचे साम्राज्य आहे. गाळ, कचरा यांनी बारा महिने ते भरलेले दिसतात. अनधिकृत बांधकामांमुळे रस्त्याची रूंदी कमी झाली आहे. स्टेशनबाहेर व मोक्याच्या रस्त्यांवर सारे पदपथ फेरीवाल्यांनी बेकादेशीरपणे काबीज केले आहेत. मुख्य रस्त्यावर खाद्य पदार्थांच्या गाड्यांनी गर्दी आहे. रस्त्यावर शेगड्या पेटवून खाद्य पदार्थ सर्रास बनवले जातात नि भांडी- कुंडीही रस्त्यावरच विसळली जातात. त्यातून गटारे जाम होतात. मग जोरदार पाऊस झाला की काही तासातच या महानगराचे जीवन विस्कळीत होते.
महामुंबईसाठी किती यंत्रणा व किती प्राधिकरणे काम करतात? मुंबई महापालिका, म्हाडा, एमएमआरडीए, जिल्हाधिकारी, नगरविकास खाते, सार्वजनिक बांधकाम खाते, रस्ते विकास महामंडळ वगैरे . झोपडपट्टी पुर्नवसन ( एसआरए ) ही यंत्रणा सर्वात मलईदार म्हणून तिची ख्याती आहे. बहुतेक यंत्रणा भ्रष्टाचाराने सडल्या आहेत. प्रशानस भ्रष्टाचाराने बरबटले असेल तर मुंबई तुंबई होण्यापासून मुक्त कशी राहणार? त्यामुळेच पावसाने मुंबई दरवर्षी जलमय होते त्याला जबाबदार कोण, हा प्रश्‍न अनुत्तरीत राहतो.
दोन जुलैच्या पावसाने मुंबईच्या प्रशासनाच्या अब्रुची लक्तरे सालाबादाप्रमाणे पुन्हा एका वेशीवर टांगली गेली. मुंबई तुंबल्यावर रोडिओ जॉकी मलिष्का तिच्या साथीदारांसह, गेली गेली मुंबई खड्डयात असे गाणे म्हणत नाचू लागली. तुंंबलेल्या पाण्याने लॅप्टोसारखे आजार घाव घालतात हे ठाऊक असुनही मुंबईकरांना वेढलेल्या पाण्यात कित्येक तास काढावे लागले. 26 जुलै 2005 रोजी मुंबईत 944 मिमी पाऊस कोसळला होता आणि मुंबई ठप्प झाली. त्या दिवशीच्या भयानक अनुभवानंतर प्रशासनाने काहीच बोध घेतला नाही का? गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सरकारने 2034 पर्यंतचा मुंबईचा विकास आराखडा जाहीर केला. तो मुळातच चार वर्षे उशीराने आला. त्यात मुंबईच्या विकास योजनांची माहिती आहे. पण मुंबईसमोरील कोणती आव्हाने आहेत, याचा चकार शब्दानेही उल्लेख नाही. दरवर्षी कोसळणारा पाऊस हे सरकारला आव्हान वाटत नाही काय? भंांडूप- कांजुरमार्ग येथे मिठागरांवर एक लाख घरे बांधण्यासाठी सरकारने एक समिती नेमली पण पाण्याचा निसरा होण्यासाठी राबण्यात येणारी ब्रिमस्टॉवड योजना चौदा वर्षांनंतरही पूर्ण होऊ शकली नाही. या प्रकल्पाची किंमत बारा वर्षात 1200 कोटीवरून 4 हजार कोटीवर गेली आहे. 2005, 2011, 2017 आणि यंदा 2019 असा अभूतपूर्व पाऊस मुंबईत कोसळला. पण पावसाने येणार्‍या पुराला थोपवण्यासाठी विकास आरखड्यात गंभीर विचार केलेला नाही.
मुंबईचा आकार बशीसारखा आहे. दोनशे मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला की मुंबई तुंबते, समुद्रात भरती सुरू झाली की मुंबईत सखल भागात पाणी मोठ्या प्रमाणावर साचते ही कारणे वर्षानुवर्षे ऐकायला मिळत आहे. पाणी वाहून नेण्याची क्षमता संपते, असे कारण सांगून झालेल्या तुंबईचे खापर पावसावर फोडले जाते.
पावसाचे जुने रेकॉर्ड तपासले तर 200 मिमी पेक्षा मुंबईत अनेकदा पाऊस कोसळला आहे. 3 ऑगस्ट 1881 रोजी मुंबईत कुलाबा येथे 287 मिमी, 10 सप्टेंबर 1930 रोजी 548. 1 मिमी, 5 जुलै 1974 रोजी 575. 6 मिमी, 10 जून 1991 रोजी 477. 6 मिमी, पाऊस पडल्याची नोंद आहे. दोन जुलै 2019 रोजी उपनगरात 375. 2 व दिंडोशी येथे 478. 56 मिमी पाऊस पडला. कुर्ला, मालाड, चिंचोली, विक्रोळी, गोरेगाव, कांदिवली अशा भागात 400 मिमी पेक्षा जास्त पाऊस कोसळला. दरवर्षी पावसाळ्यात होणार्‍या जलात्कारातून मुंबईची सुटका कधी होणार हा खरा प्रश्‍न आहे.
26 जुलै 2005 चा पाऊस दुपारनंतर सुरू झाला होता, त्या दिवशी लक्षावधी लोक सायंकाळी घरी जाताना अडकले. हजारो मोटारी रस्त्यात तुंबलेल्या पाण्यात अडकल्या वा बंद पडल्या. काही लोकांचे बंद मोटारीत मृत्ुयू झाले. लोकल वाहतूक सुरळीत होण्यास तेव्हा तीन आठवडे गेले. तुललेने दोन जुलै 2019 रोजी हजारो लोकांनी घरीच थांबणे पसंत केले. रस्त्यावरच्या पाण्यात आपल्या मोटारी बुडू नयेत म्हणून लोकांनी त्या उड्डाण पुलांवर नेऊन ठेवलेल्या आढळल्या. 2008 मधे मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईत सर्वत्र सीसीटीव्हीचे जाळे उभारले गेले, त्यामुळे दोन जुलैला मुंबईत कुठे पाणी तुंबले आहे हे पोलीस व आपदकालीन नियंत्रण कक्षात लगेच समजत होते. 26 जुलै नंतर मिठी नदीच्या रूंदी करणावर साडेसहाशे कोटी खर्च झालेत. त्यामुळे मिठी नदी 2 जुलैला रस्त्यावर आली नाही. सोशल मिडियवरून मुंबईत कुठे काय घडते आहे, याच्या माहितीची देवाण घेवाण अखंड चालू होती. पावसामुळे मोबाईल फोन किंवा घरातील टीव्ही बंद पडले असे झाले नाही. मुंबई पोलीस भरपावसात नि तुंबलेल्या पाण्यात सर्वत्र दिसले. पाण्यातून रस्ता ओलांडण्यास मदत करण्यापासून ते बंद मोटारींना धक्का मारून ढकलण्यापर्यंत ते काम करताना दिसले. बेस्टचे ड्रायव्हर- कंडक्टरही चार ते सहा तास प्रवास करून बस डेपोत पोचले. वृत्तपत्र विक्रेते आणि दूध वितरक यांचे खरोखरच कौतुक केले पाहिजे. आठवडाभर मुंबईत धो धो पाऊस असुनही मुंबईकरांना दैनिक वृत्तपत्रे नि दूध घरपोच मिळण्यात एक दिवसही खंड पडला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *