भाजप अल्पसंख्याक उपाध्यक्ष तसनीफ़ नूर शेख यांच्या पाठपुराव्याला यश

प्रतिनिधी

वसई- नियुक्तीपासूनच वादग्रस्त ठरलेल्या वसई-विरार महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय (आरोग्य) अधिकारी डॉ. सुरेखा वाळके यांची अखेर आयुक्त गंगाथरन डी. यांनी उचलबांगड़ी केली आहे. त्यांच्या जागी तुळींज रुग्णालयाच्या प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. भक्ति चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

डॉ. सुरेखा वाळके यांनी सुरुवातीपासूनच विशेषकरून कोविड-१९ संक्रमण काळात नागरिकांच्या आरोग्याबाबत हलगर्जी आणि बेफ़िकिरी दाखवल्याने भाजप अल्पसंख्याक उपाध्यक्ष तसनीफ़ नूर शेख यांनी नाराजी व्यक्त केली होती. ही बाब त्यांनी आयुक्त गंगाथरन डी. यांच्याही निदर्शनास आणून दिली होती.

कोविड-१९ काळात ड़ॉ. सुरेखा वाळके नागरिकांचे फोन उचलत नसल्याने त्यांच्या बाबत अनेक तक्रारी होत्या. वसई-विरार महापालिकेला राज्य सरकारकडून किती लसीं मिळतात व त्यांचे नियोजन कसे होते? याबाबतही त्यांना काहीच माहिती नव्हती.

उलट वेळोवेळी लसीकरण मोहिमेदरम्यान उडालेला गोंधळ व नियोजनाचा अभाव यामुळे डॉ. सुरेखा वाळके यांच्या बाबत नागरिकांत प्रचंड नाराजी होती. त्यामुळे शेख यांनी ड़ॉ. सुरेखा वाळके यांना या पदावरुन पायउतार करतानाच; त्यांच्या जागी योग्य व्यक्तीची नियुक्ती करावी, अशी मागणी केली होती.

विशेष म्हणजे आयुक्त गंगाथरन डी. आणि डॉ. सुरेखा वाळके यांच्यात वेळोवेळी समन्वयाचा अभावही दिसून आलेला आहे. मात्र याचे परिणाम नागरिकांना भोगावे लागले आहेत.

दरम्यान; ड़ॉ. सुरेखा वाळके यांच्या जागी तुळींज रुग्णालयाच्या प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. भक्ति चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *