
प्रतिनिधी :
अर्नाळा पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल होऊन दोन महिने उलटून ही पोलिसांना गुंगारा देणाऱ्या फरार आरोपीच्या पोलिसांनी अखेर मुसक्या आवळल्या आहेत. पीडित मुलीने पोलीस आयुक्त सदानंद दाते यांची भेट घेतल्यानंतर अर्नाळा पोलिसांनी आरोपीला गजाआड केले.
या बाबत अधिक माहिती अशी की, अर्नाळा येथील एक तरुण अभिषेक संतोष तामोरे याने पीडित तरुणीशी साखरपुडा केल्यानंतर ती मुलगी त्याच्या घरी जात असे. संधीचा फायदा उठवित तरुणाने तिच्यावर शारीरिक संबंधाकरिता दबाव आणून ऑगस्ट २०१८ ते जुलै २०२१ दरम्यान अनेकदा शारीरिक संबंध ठेऊन नंतर पीडित मुलीला सोडून दुसऱ्या मुलीबरोबर पळून गेला. सदर प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून दि. १७/७/२०२१ रोजी अर्नाळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होऊन दिड महिना उलटला मात्र आरोपी पोलिसांच्या तावडीत सापडत नव्हता. पोलीस आरोपीचा कसून शोध घेत असल्याचे पोलीस निरीक्षक राजू माने सांगत होते. अखेर पीडित मुलीने मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्त सदानंद दाते यांची भेट घेतली. सदानंद दाते यांनी थेट पोलीस निरीक्षक राजू माने यांना फोन करून अद्याप पर्यंत आरोपीला अटक का झाली नाही, अशी विचारणा करून आरोपीला तात्काळ अटक करा असे आदेश दिले. आणि अखेर अर्नाळा पोलिसांनी आरोपीला गजाआड केले.