पालघर दि 29 : कोव्हीड 19 मूळे उद्धवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षी राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमाना बंदी असून जिल्ह्यातील प्रत्येक मुस्लिम नागरिकाने बकरी ईदच्या दिवशी ईदची नमाज मस्जिद किंवा इदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता घरातून च नमाज अदा करावी असे विनंतीवजा आवाहन आज जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांनी केले. तसेच सध्या कार्यान्वित असणारे जनावरांचे बाजार व कत्तलखाने बंद असून नागरिकांनी शक्यतो प्रतिकात्मक कुर्बाणी करावी ही महत्वपूर्ण सूचना यावेळी देण्यात आली.

शासन परिपत्रक डीआयएस ०६२०/प्र.क्र.९१/विशा१ब नुसार बकरी ईद २०२० बाबत मार्गदर्शक सूचना देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्ह्यातील मुस्लिम समाजातील सामाजिक कार्यकर्ते, संस्थेचे प्रतिनिधी, मौलवी, यांची बैठक आयोजित केली होती. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे व पालघर जिल्हा पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे यांनी यावेळी उपस्थितांना सूचना दिल्या.
रमजान ईदच्या वेळी मुस्लिम बांधवांनी जसे सहकार्य केले तसेच सहकार्य यावेळी ही करतील अशी आशा जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांनी व्यक्त केली.
बकरी ईदच्या निमित्ताने एकत्र येणे टाळणे सर्वांसाठी बंधनकारक असून शासनाने जे नियम सर्व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी बनवले आहेत ते पाळणे सर्वांच्या हिताचे आहेत असे सांगून सर्व धार्मिक सणांमध्ये अशीच परिस्थिती असणार आहे , येत्या दीपावली पर्यंत तरी सार्वजनिक स्वरूपात सण साजरे करता येणार नाही, त्यामुळे तुम्ही सर्वांनी पोलीस प्रशासन,जिल्हा प्रशासन यांना सहकार्य करावे असे आवाहनहि जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, उपजिल्हाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी किरण महाजन, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, पोलीस निरीक्षक जिल्हा विशेष शाखा सुधीर संखे,तहसीलदार उज्वला भगत, वसई विरार चे प्रथम उपमहापौर सगीर डांगे,पालघर नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष रईस खान, इकबाल धनानी व मुस्लिम सामाजिक संघटनाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *