

अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणारी वसई-विरार महापालिकेतील सत्ताधारी सोनेरी टोळीच भूमी विनोद पाटील या चिमुरडीच्या मृत्यूला जबाबदार आहे. ही दुर्घटना नसून त्या लहानगीची हत्या आहे. अशा अनधिकृत बांधकामांना अभय देणाऱ्या सोनेरी टोळीची चौकशी सरकारने करावी, अशी तोफ नालासोपारा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रदीप शर्मा यांनी डागली आहे.
विरार पूर्व येथील कोपरी परिसरातील नित्यानंद धाम या चार मजली इमारतीचा काही भाग मंगळवारी रात्री कोसळून भूमी विनोद पाटील ही पाच वर्षांची चिमुरडी मृत्युमुखी पडली. या दुर्घटनेमुळे विरार, नालासोपारा भागातील जुन्या, अनधिकृत इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
महायुतीचे उमेदवार प्रदीप शर्मा यांनी जुन्या, अनधिकृत इमारतींतील रहिवाशांना हक्काचा सुरक्षित निवारा मिळावा यासाठीच क्लस्टर योजनेचे सुतोवाच जाहीरनाम्यात केले आहे. मृत भूमीला त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली असून जुन्या इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यास आपले प्राधान्य राहील, असे म्हटले आहे. बचावकार्यात अडथळे नकोत म्हणून त्यांनी दुर्घटनास्थळीही जायचे टाळत प्रसिद्धीलोलूप नेत्यांपेक्षा वेगळ्या दृष्टीकोनाचा प्रत्यय मंगळवारी रात्री दिला होता.