

वसई : (प्रतिनिधी) : यंदा झालेल्या अतिवृष्टीत वसई तालुक्यातील शेतकर्यांचे आणि मच्छिमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऑगस्ट महिन्यात झालेल्या मुसळधार पावसात रूजवात झालेली भातशेती तग धरण्याआधीच कुजल्याने शेतकर्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. भातशेती कुजल्याने शेतकर्यांना पुन्हा दुबारपेरणी करावी लागली होती. यावेळी शासनाकडे शेतकर्यांच्या झालेल्या नुकसानासंदर्भात शासनाकडे 6 कोटीची मागणी करण्यात आली होती. ही मागणी जुनी असतानाच आता परतीच्या पावसाने शेतकर्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास पुन्हा हिरावून घेतला आहे. शेतकर्यांबरोबरच वारंवार आलेल्या मुसळधार पावसाचा पालघरच्या पश्चिम किनारपट्टीलादेखील तितकाच फटका बसला आहे. पारंपरिक मासेमारी व्यवसाय करणार्या मच्छिमारांना मच्छी सुकवण्यासाठी असलेल्या जागेला पुराचा आणि उधाणाच्या लाटांचा फटका बसल्याने मच्छिमारांचेदेखील मोठे नुकसान झाले आहे. शेतकर्यांचे आणि मच्छिमारांचे डोळे पुसण्यासाठी बहुजन विकास आघाडीचे माजी खासदार बळीराम जाधव यांनी पुढाकार घेतला असून त्यांनी मंगळवारी (दि.5) पालघरचे जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांची भेट घेऊन नुकसान भरपाई मिळण्याबाबत निवेदन सादर केले. सदरची नुकसान भरपाई शेतकर्यांना तात्काळ मिळावी यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करणार असल्याचे माजी खासदार बळीराम जाधव यांनी बोलताना सांगितले.
यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्यांचे जे अतोनात नुकसान झाले आहे त्यासंदर्भात शासनाकडे ऑगस्त महिन्यापासून नुकसान भरपाई मिळण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. ऑगस्टमध्ये झालेल्या पुरामुळे जिल्ह्यातील 7 हजार 220 हेक्टर क्षेत्रावरील भातपिक, बागायती क्षेत्र अनेक दिवस पाण्याखाली गेल्याने झालेल्या नुकसानीचे पंचनामे कृषी विभागाने पूर्ण करून या नुकसानग्रस्त शेतकर्यांनी नुकसान भरपाईपोटी 6 कोटी रूपयांची मागणी शासनाकडे करण्यात आली असून तसा प्रस्तावही शासनाकडे पाठविण्यात आला आहे. ज्यांनी पिक विमान उतरविला नाही अशा शेतकर्यांनाही त्यांची नुकसान भरपाई नियमानुसार शासन पातळीवरून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु आता पुन्हा परतीच्या पावसामुळे शेतीमधील उभी पिके पावसामुळे भिजत शेतकर्यांच्या हाता-तोंडाशी आलेले पिकाचे नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून शेतकर्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी माजी खासदार बळीराम जाधव यांनी केली आहे. पालघर जिल्ह्यातील वसई, डहाणू, सातपाटी, वडराई, केळवे, माहीम, मुरबे, एडवण, कोरे, दातिवरे, उच्छेली, दांडी, नवापूर इत्यादी मच्छिमार गावात हजारो टन पकडून आणलेले मासे सुकविण्यासाठी बांबूच्या ओलांदीवर लावण्यात आले असताना ऑक्टोबर 2019 मध्ये परतीच्या पावसाने तसेच वादळी वार्यामुळे दिलेल्या तडाख्यामुळे हे मासे कुजून खराब झाल्याने मच्छिमारांचे प्रचंड नुकसान झाले असून याबाबत शेतकर्यांना देण्यात येणार्या नुकसान भरपाईच्या निकषावर मच्छिमारांनाही नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे माजी खासदार बळीराम जाधव यांनी केली आहे.
वसईतील आंबोडे-आदिवासीपाडा रस्त्याच्या कामाचीही चौकशी करा… बळीराम जाधव
शेतकरी आणि मच्छिमार यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी माजी खासदार बळरिाम जाधव यांनी जिल्हाधिकार्यांना निवेदन सादर केल्यानंतर वसई तालुक्यातील आंबोडे येथील आदिवासी पाडा याठिकाणी जाणार्या रस्त्याच्या कामाची चौकशी करण्याची मागणीदेखील माजी खासदार बळीराम जाधव यांनी दुसर्या एका निवेदनात केली आहे. सदर रस्त्याच्या कामासाठी आदिवासी विकास कार्यक्रमांतर्गत रूपये 20 लाख रूपये मंजूर होवून सदर काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ठेकेदाराने पूर्ण केले आहे. परंतु प्रत्यक्ष पाहणी केली असता आंबाडे नदी-आदिवासीपाडा हा रस्ता ज्याठिकाणी झाला आहे. त्या बाजूला आदिवासी वस्ती अथवा घरेच नाहीत. तर हा रस्ता दुसर्या ठिकाणी बनविण्यात आला असून प्रत्यक्ष आदिवासी पाड्यातील नागरिकांना या रस्त्याचा कोनताही उपयोग झालेला नाही. संबंधित ठेकेदार व अधिकारी यांनी संबंधित विभागाला चुकीची माहिती सादर करून निधीचा गैरवापर केला असल्याचा आरोप माजी खासदार बळीराम जाधव यांनी व्यक्त केला आहे. याकामी चौकशी करण्याची मागणी त्यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.