

ठाणे/दि.1 जून – श्रमजीवी संघटनेच्या ‘अन्नसत्याग्रहाची” आज अखेर दुसऱ्या दिवशी यशस्वी सांगता झाली, सरकारकडून मागण्यांच्या पूर्ततेबाबत आश्वासक पत्र मिळाल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक पुष्पत जैन आणि तलाह मुखी यांच्या हस्ते आज संध्याकाळी लिंबूपाणी घेत सत्याग्रहींनी उपोषण सोडले.
श्रमजीवी संघटनेचे विवेक पंडित, विद्युल्लता पंडित आणि रामभाऊ वारणा यांनी कालपासून घोडबंदर येथे महामार्गालगत “अन्नसत्याग्रह* सुरू केले होते. पंडित यांच्याप्रमाणेच ठाणे, पालघर, रायगड आणि नाशिक जिल्ह्यातील 19 तालुकाच्या ठिकाणी श्रमजीवी पदाधिकाऱ्यांनी उपोषण सुरू केले होते. या सत्याग्रहींना पाठिंबा देण्यासाठी त्या त्या ठिकाणी शेकडो सभासद रस्त्यावर एकत्र येऊन सत्याग्रहिंना साथ देत होते. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विवेक पंडित यांना कॉल करुन प्रकृतीची विचारपूस करत उपोषण सोडल्याबद्दल समाधान व्यक्त केले. आदिवासींच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक व्हावी याबाबत सरकार आग्रही राहणार असून संघटनेने माझ्या निदर्शनास आणावे मी स्वतः याबाबत लक्ष घालणार असल्याचे वचन यावेळी मुख्यमंत्र्यांनी पंडित यांना दिले.
आज दुपारी राज्याच्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर हे एकच वेळी घोडबंदर येथे सत्याग्रहींची भेट घेण्यास आले होते. फडणवीस आणि दरेकर यांनीही काल(दि.३१) रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून श्रमजीवीच्या मागण्या मान्य करून विवेक पंडितांचे उपोषण लवकरच सोडवावे अशी मागणी केली होती.त्यांचेही श्रमजीवीने तसेच स्वतः विवेक पंडित यांनी आभार व्यक्त केले.
नगरविकास मंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आंदोलकांच्या मागण्या पूर्ण होण्याबाबत मोलाचे सहकार्य केले, सतत ते याबाबत सकारात्मक तोडगा निघावा यासाठी प्रयत्नशील दिसले, तसेच पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनीही उपोषणाच्या ठिकाणी भेट देत पूर्ण पाठींबा दर्शविला होता, मंत्री एकनाथ शिंदे आणि खा.गावित यांचेही पंडित यांनी आभार व्यक्त केले.
आज प्रधान सचिव भूषण गगराणी यांच्याकडे श्रमजीवी संघटनेने केलेल्या मागण्यांबाबत संबंधित खात्यांचा समन्वय साधून सकारात्मक कार्यवाहिची जबाबदारी सरकारने दिली. त्यानंतर गगराणी यांनी याबाबत सर्व संबंधित सचिवांशी चर्चा करून याबाबत कालबद्ध कार्यक्रम निश्चित केल्यानंतर विवेक पंडित यांना याबाबत अवगत केले. महाराष्ट्राचे उपसचिव ल.गो.ढोके यांनी याबाबत पंडित यांना पत्र देत आपल्या मागण्यांबाबत सकारात्मक कार्यवाही सुरू असून कोरोना काळातील प्रशासनाची अडचण लक्षात घेत तातडीने उपोषण मागे घ्यावे अशी विनंती केल्याचे पत्र मिळाल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.
लॉकडाऊन काळात आदिवासींवर उपासमार ओढवली असून याकाळात श्रमजीवी संघटनेने सामाजिक बांधिलकी जपत शक्य ती मदत करत 49 हजारपेक्षा जास्त कुटुंबाना साहाय्य केले. मात्र हजारो आदिवासी कुटुंब रेशनकार्ड पासून वंचित आहेत, तर प्रत्येक अदिवासीला जीवनावश्यक वस्तू उदा. तेल, डाळ, कडधान्य, हळद, मीठ मसाला देण्यात यावा अशी संघाटनेची मागणी होती, या मागण्या पूर्ण व्हाव्या याबाबत सर्व मार्ग वापरून अखेर श्रमजीवी संघटनेने अन्न सत्याग्रहाचा मार्ग निवडला होता.
हे आंदोलनाचे मोठे यश आहे, लोकशाहीमध्ये आपल्या हक्कांसाठी सत्याग्रह करण्याचा अधिकार आहे, तो आम्ही बजावला, या काळात चारही जिल्ह्यातल्या पोलिसांनी केलेले काम लोकशाहीचा सन्मान करणारे, लोकशाही व्यवस्था बळकट करणारे आहे, आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या आंदोलकाना जेवण पाणी देणारे पोलीस आपल्या सदृढ लोकशाहीचे प्रतिक म्हणून पाहायला मिळाल्याने विवेक पंडित यांनी सर्व पोलिस अधिकारी,कर्मचाऱ्यांचे आभार मानले.विवेक पंडित ,विद्युल्लता पंडित आणि रामभाऊ वारणा यांचे उपोषण सुटल्यानंतर य 19 तालुक्यातील उपोषणकर्त्यांनी एकाच वेळी लिंबूपाणी घेऊन उपोषणाची सांगता केली.
यशाचे सर्व श्रेय मैदानात लढणाऱ्या श्रमजीवी सैनिकांचे आहे असे यावेळी विवेक पंडित यांनी सांगितले तर श्रमजीवीच्या शिस्त आणि संघटित शक्तीचा हा विजय आहे आशा शब्दात विद्युल्लता पंडित यांनी सर्व आंदोलकांचे कौतुक केले