

२६ जानेवारी १९७० रोजी स्थापन झालेल्या युवक मित्रमंडळाने त्याच वर्षापासून नवरात्रोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली.मागची ४९ वर्ष ही परंपरा ३ वेगवेगळ्या पिढ्यांनी सुरु ठेवली असून ह्यावर्षी ह्या उत्सवाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष होते. नवनविन चित्तवेधक आणि सामाजिक संदेश देणारे देखावे व स्पर्धा, स्थानिक कलाकारांनी सादर केलेली नाटके, एकांकीका व सांस्कृतिक कार्यक्रम ह्या उत्सवाचा अविभाज्य भाग असून किर्तने,पारायणे इ. कार्यक्रमही उत्सवामधे पार पाडले जातात.
यंदाचे वर्ष मंडळाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष असल्याने संपूर्ण उत्सवात नानाविध कार्यक्रमांची रेलचेल होती.
ह्या वर्षीच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमधे वर्दे-पाटकर महाविद्यालयातर्फे दोन एकांकीका सादर करण्यात आल्या तसेच स्थानिक मंडळे कलाप्रेमी माहीम व क्रिएटिव्ह कलाकार वसई ह्या मंडळांनीही दोन एकांकीका सादर केल्या. त्याच बरोबर गर्जतो मराठी नावाचा वाद्यवृंद संगीताचा कार्यक्रम सादर करण्यात आला तसेच रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा , महिलांसाठी पाककला स्पर्धा देखील आयोजित केल्या गेल्या.सुश्राव्य किर्तन, श्रीराम संपथ व मंडळींचे बासरी वादन व मेलेडी, स्थानिक कलाकारांच्या सांस्कृतिक कार्यक्रमामधिल नांदी, मंगळागौर, सामाजिक संदेश देणारे मोनो अॅक्ट,महाराष्ट्राची लोकधारा,लोकसंगीत,गणेश वंदन,गोंधळ,जोगवा,कोळीनृत, गरबा नृत्याचा आस्वादही भाविकांना ह्या सुवर्ण महोत्सवी उत्सवा दरम्यान घेता आला.
ढोलताशा,टाळ- मृदंगाच्या जयघोषात श्री दुर्गादेवी मातेची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
भक्तीमय वातावरण,ढोलताशांचा गर्जनाद, हिंदू धर्माचे पालन प्रतिक असलेले भगवे झेंडे आणि सभासदांचा उत्साह यामुळे आजची मिरवणूक संस्मरणीय ठरली.
नेहमी प्रमाणेआजच्या विसर्जन मिरवणूकीत सुद्धा सर्व धर्मियांचा सहभाग दिसून आला हे विशेष. विसर्जन मिरवणूकीत गावातील सर्व युवक युवतींनी पारंपारिक वेशात भाग घेतला होता.
सुर-ताल-लय आणि सोबत ढोलताशा,लेझीम,टाळ, मृदंगाच्या तालावर नृत्य हे या भव्य मिरवणूकीचे खास आकर्षण.
श्री सच्चिदानंद महाडीक ह्याच्या अध्यक्षतेखाली १९७० साली सुरु झालेल्या युवक मित्रमंडळाचे अध्यक्षपद सर्वश्री. विनोद पाटिल, सुधीर महाडिक, प्रविण पाटिल, मिलिंद पाटिल, प्रदिप बारी, मुझफ्फर शेख, प्रदिप कोरडे, चंद्रकांत साखरे, रमेश पाटिल इ. व इतर मान्यवरांनी भुषविले असून सध्या प्रविण पाटिल ह्यांच्या अध्यक्षतेखालील कार्यकारी मंडळात हिंदू, मुस्लीम व ख्रिश्चन अशा सर्व धर्मीय कार्यकर्त्यांचा समावेश आहे. अशा सर्वधर्म समभावाचा संदेश देणाऱ्या ह्या उत्सवासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व भाविक, सरकारी यंत्रणा आणि गावकर्यांचे युवक मित्रमंडळाचे आभार मानले आहेत.