
वसई-विरार महापालिकेवर यंदा भगवा फड़कलाच पाहिजे!
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले बळ!


मुंबई- वसई-विरार महापालिकेवर या वेळी भगवा फड़कलाच पाहिजे. यासाठी सगळ्यांनी एकदिलाने-एकमताने कामाला लागा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पदाधिकारी-कार्यकर्त्यांना केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवार,
१६ फेब्रुवारी रोजी वसई-विरार शहर महापालिका निवडणुकीसंदर्भात आढावा घेण्यासाठी वसई तालुक्यातील वरिष्ठ पदाधिकारी यांना आमंत्रित करून महापालिका निवडणुकी संदर्भात चर्चा केली.
या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वसई-विरार महापालिकेवर भगवा फड़कवायचा आहे. त्यासाठी एकदिलाने-एकमताने कामाला लागा, असे आवाहन केले.
शिवसेना पालघर संपर्क प्रमुख रविंद्र फाटक यांनी नुकत्याच केलेल्या वसई-दौऱ्यात वसईतील अन्य पक्षांचे पदाधिकारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करू इच्छीत असल्याचे सूतोवाच केले होते.
आमदार रविंद्र फाटक यांच्या या सूतोवाचाची व आगामी वसई-विरार महापालिका निवडणुकीबाबत आढावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी वसईतील वरिष्ठ पदाधिकारी यांना तातडीने बोलावून घेतले होते.
विशेष म्हणजे या वेळी शिवसेनेत नव्याने प्रवेश केलेल्या युवा नेता पंकज देशमुख व कल्याणी पाटील, आदिवासी एकता परिषदेचे दत्ता सांबरे
यांनाही मुख्यमंत्री खास भेटीचे निमंत्रण ठाकरे यांनी दिले होते.
या वेळी या दोघांना उद्धव ठाकरे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व आमदार रविंद्र फाटक यांच्या उपस्थितीत ‘शिवबंधन’ बांधून शिवसेनेत स्वागत केले.
या प्रसंगी वसई शिवसेनेच्या वतीने तालुका प्रमुख निलेश तेंडोलकर, वसई तालुका अल्पसंख्याक क्षेत्र प्रमुख सलिम खान, महिला आघाडी जिल्हा संघटक किरण चेंदवणकर आणि शिवसेना वसई तालुका कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.