
नालासोपारा :- पोलिस निरीक्षकांच्या रखडलेल्या बदल्यांना अखेर मुहूर्त मिळाला असून मिरा भाईंदर वसई विरार पोलिस आयुक्तालयाच्या १२ पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या मंगळवारी करण्यात आलेल्या आहेत. बाहेरून बदली होऊन आलेल्या दोन अधिकाऱ्यांना आस्थापनेवर नेमणूक केली असून या सर्व बदल्या आणि नियुक्त्या पोलिस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांच्या आदेशाने झाल्या आहेत. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना अंगारकीचा मुहूर्त मिळाला असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय सुरू होऊन सव्वा दोन वर्षाचा कालावधी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस आयुक्तालयांतर्गत कार्यरत अनेक वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक व उपनिरीक्षकांचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे. यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या मंगळवारी रात्री करण्यात आलेल्या आहेत. पोलिस स्टेशनमध्ये साधरणत: दोन वर्षे व अन्य शाखेत तीन वर्षे कार्यकाळ पूर्ण झालेला अधिकारी बदलीस पात्र असतो. पोलिस स्टेशन व अन्य शाखेत कार्यकळ पूर्ण झाल्यानंतर अजूनही या अधिकाऱ्यांची बदली झालेली नाही. पन्नासपेक्षा अधिक अधिकाऱ्यांची बदली होणे अपेक्षित आहे. त्यावेळी तत्कालीन पोलीस आयुक्त सदानंद दाते यांच्यासह काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करणार अशी चर्चा सर्वत्र सुरू होती पण त्यांनी काही कारणास्तव कोणत्याही अधिकाऱ्यांची बदली केली नाही. नव्याने आलेले पोलीस आयुक्त मधुकर पांडेय हे तात्काळ बदल्या करतील पण असे झाले नाही. त्यांनी २६ दिवसानंतर १२ पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या केल्या आहेत.
पोलिस निरीक्षक देविदास हंडोरे (अंमली पदार्थ विरोधी पथक) यांची काशीमिरा वाहतूक शाखेत, संदीप कदम (नियंत्रण कक्ष) यांची काशीमिरा पोलीस ठाणे, दादाराम कारंडे (विरार, वाहतूक शाखा) यांची उत्तन पोलिस ठाणे, प्रशांत लांगी (उत्तन पोलीस ठाणे) यांची विरार, वाहतूक शाखेत, संजय हजारे (काशीमिरा पोलीस ठाणे) यांची परवाना शाखेत, रणजित आंधळे (परवाना शाखा) यांची वसई पोलीस ठाणे, राजेंद्र कांबळे (तुळींज पोलीस ठाणे) यांची विरार पोलीस ठाणे, शैलेंद्र नगरकर (नियंत्रण शाखा) यांची तुळींज पोलीस ठाणे, कल्याणराव कर्पे (वसई पोलीस ठाणे) यांची अर्नाळा पोलीस ठाणे, सुरेश वराडे (विरार पोलीस ठाणे) यांची विशेष शाखेत, अमर मराठे (पेल्हार पोलीस ठाणे) यांची अंमली पदार्थ विरोधी पथक, राजू माने (अर्नाळा पोलीस ठाणे) यांची नियंत्रण शाखेत बदली करण्यात आली आहे. तर पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत लब्दे यांच्याकडे कार्यभार ठेवण्यात आला आहे. तसेच पुणे ग्रामीण येथून आलेले पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी आणि मुंबई शहर येथून आलेले पोलीस निरीक्षक प्रवीण कदम यांना आस्थापनेवर हजर करून घेतले असून पुढील आदेश होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात नियंत्रण कक्ष येथे नेमणूक केली आहे.