

वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील विविध ठिकाणच्या रस्त्यावर पावसामुळे पडलेल्या खड्ड्यांची दुरुस्ती करणेचे काम लवकरात लवकर करण्याबाबतच्या सूचना मा.आयुक्त ह्यांनी महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेल्या होत्या. त्यानुसार संबंधित विभागामार्फत महानगरपालिकेच्या पॅनलवरील ठेकेदारांकडून रस्त्यावरील खड्डे दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने आज दि.०४.०९.२०२० रोजी मा.आयुक्त यांनी खड्डे दुरुस्तीचे कामाचा पाहणी दौरा केला असता प्रभाग समिती ‘डी’ मधील रस्त्यावरील खड्डे दुरुस्त करणे कामी नियुक्त केलेल्या ठेकेदारामार्फत जुने व निकृष्ट दर्जाचे पेव्हर ब्लॉक वापरले जात असल्याचे मा.आयुक्त ह्यांच्या निदर्शनास आले. यापूर्वीच मा.आयुक्त यांनी विभागाला व ठेकेदारांना रस्त्यावरील खड्डे दुरुस्तीचे काम योग्यरीतीने होत नसलेबाबत वारंवार सूचना दिलेल्या होत्या. परंतु तरीही रस्त्यावरील खड्डे दुरुस्तीच्या कामात हलगर्जीपणा झाल्याचे निदर्शनास आल्यामुळे मा.आयुक्त ह्यांनी संबंधित ठेकेदार मे.राठोड भगीरथी अॅड कंपनी ह्यांना तात्काळ महानगरपालिकेच्या ठेकेदार पॅनल वरून काढुन टाकणेची व ठेकेदाराविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करणेची सूचना संबंधित विभागास दिली असून, संबंधित कामावर लक्ष ठेवणाऱ्या श्री.मिलिंद शिरसाट, कनिष्ट अभियंता (ठेका) यांना कामावरून कमी करण्याचे व श्री.एकनाथ ठाकरे, शाखा अभियंता यांना कामात हलगर्जीपणा केल्याबाबत कारणे दाखवा नोटीस देण्याचे आदेश मा.आयुक्त ह्यांनी संबधीत विभागास दिले.