

वसई : (प्रतिनिधी) : राज्यभर सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर प्रचारसभांतून भाजपची पोळखोळ करण्याचे काम जोमाने सुरू ठेवले असताना वसईत पुन्हा भाजपच्या जाहीर सभेत पुन्हा चुकीचीच री ओढली गेल्याचे चित्र दिसून आले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसईच्या प्रांताधिकार्यांनी वसई तालुक्यातून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांना हद्दपार केले आहे. हद्दपारीचे आदेश असतानाही कुप्रसिद्ध गुन्हेगार संजय बिहारी याने कालच्या नालासोपार्यात झालेल्या केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या प्रचारसभेला हजेरी लावली. हद्दापरीचे आदेश असतानादेखील संजय बिहारी याला नालासोपार्यात येण्याची परवागनी दिली कोणी. हद्दपारीसारखे आदेश धाब्यावर बसवणार्या संजय बिहारी याच्याविरोधात पोलिसांनी आता कडक कारवाईची भूमिका घ्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी नालासोपारा आणि मीरा रोड येथे काल सभा घेतल्या. नालासोपारा येथील सभेत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. केंद्रीय गृहमंत्र्यांची सभा असल्यामुळे अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारीदेखील सभास्थळी हजर होते. मात्र, तरीही तडीपार केलेला संजय बिहारी हा गुंड सभेला हजर राहिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. संजय बिहारी भाजपचे मफलर आणि टोपी घालून सभास्थळी उपस्थित होता. पालघर जिल्ह्यातील गुन्हेगारी फोफावत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणतेही गालबोट लागू नये यासाठी वसई तालुक्यासाठी प्रांताधिकारी दिपक क्षिरसागर यांनी एकूण सात गुंड तडीपार तर 26 जणांना मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. तडीपारीचे आदेश असतानाही संजय बिहारीसारखा गुंड भर प्रचारसभेत हजर राहतो यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. राजनाथ सिंह यांच्या हातात देशाच्या कायदा-सुव्यवस्थेची सुत्रे आहेत. असे असताना त्यांच्याच सभेत संजय बिहारीने घुसण्याची हिंमत कशी केली, असा प्रश्न विचारला जात आहे.
या 7 गुडांना 1 वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे…मोन्टू ऊर्फ थापा चौधरी, मनोज गुलाब सिंह, राजेश विजयशंकर यादव, प्रिन्स ऊर्फ निलेश रमेश सिंह, पवन अभिमन्यू सिंग, प्रथमेश शिवराव पवार आणि जावेद रफीक अन्सारी
तसेच मतदानाच्या कालावधीत 18 एप्रिलपासून 2 मे पर्यंत काही आरोपींना तालुक्यातून तडीपार करण्यात आल्याचे आदेश दिलेत…यामध्ये संजय बिहारी ऊर्फ संजय महंतो, गौरव ऊर्फ विकास लालनाथ किणी, कौशिक नारायण गावड, शनी शंकर वाघरी ऊर्फ मल, बालाजी रामराव फड, उस्मान गफूर पटेल, महेश मधूकर कुडू, अमित शाम व पेंढारी, अजय लालमण पांडे, बद्रीआलम आकलाक चौधरी, अंकित ऊर्फ बंटी रामअवतार यादव, रवि पंढरीन, आगिवले, डूंगाराम सवाराम पटेल, रूपेश वालतीन डिमेलो, चंद्रकांत रवि लोखंडे, बाबर ऊर्फ बाबा शमशाद खान, इत्तेशाम मोहमंद रफीक अन्सारी, पवन सुनिल सिंग, ऋषीकुमार राजबली सिंग, वामन कृष्णा किणी, उदय अरूण जाधव, सलीम बाबुमिया सरदार, सलीम बाबुमिया सरदार, गोविंदा यल्लाप्पा गुंजाळकर आणि रशिद रौफ सय्यद यांना तडीपार करण्यात आलेय._ या आरोपींवर तुलिंज, विरार, वालीव, माणिकपूर, नालासोपारा, अर्नाला आणि वसई पोलीस स्टेशनमध्ये विविध गुन्हे दाखल करण्यात आलेत.