

नालासोपाऱ्यात शिवसेना-भाजपा मनोमिलन
आता बदल होणारच – राजन नाईक यांची ग्वाही
नालासोपारा येथून अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झालेले भाजपाचे पालघर जिल्हा अध्यक्ष राजन नाईक यांनी बंडाचे निशाण खाली घेतले असून, आपल्या सर्व कार्यकर्त्यांसह आपण भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार प्रदीप शर्मा यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी बुधवारी संध्याकाळी झालेल्या महायुतीच्या बैठकीत जाहीर केले.
गुरुवारी शर्मा यांचा उमेदवारी अर्ज दाखल करायलाही नाईक आवर्जून उपस्थित होते. नाईक यांच्या पाठबळाबद्दल शर्मा यांनी त्यांचे आभार मानून, आता विरार, नालासोपाराचा कायापालट आपण एकजुटीने घडवून आणू, असा विश्वास व्यक्त केला आहे.
राजन नाईक यांची नाराजी दूर झाल्यामुळे महायुतीचा विजय आता निश्चित असून, बविआ नेतृत्वाची मात्र चांगलीच पंचाईत झाली आहे.
विरार, नालासोपाराचा कायापालट करण्याचा निर्धार करून शिवसेनेकडून प्रदीप शर्मा यांनी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केल्यावर राजन नाईक यांना मानणाऱ्या भाजपाच्या स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली होती. गेल्या निवडणुकीत राजन नाईक यांनी क्षितिज ठाकूर यांच्या विरोधात 60 हजार मते मिळवली होती. या वेळी संधी मिळाल्यास भाजपाकडून निवडणूक लढवण्याची तयारी राजन नाईक यांनी दाखवली होती. त्या प्रकारे त्यांनी मतदारसंघात आणि संघटनात्मक पातळीवरही चांगली बांधणी केली आहे.
मात्र युतीच्या जागावाटपात ही जागा शिवसेनेला देण्यात आली. बहुजन विकास आघाडीला टक्कर देण्यासाठी प्रदीप शर्मा यांना महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आल्यावर नाराज राजन नाईक यांनी अपक्ष म्हणून मैदानात उतरावे, असा त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांचा आग्रह होता. मात्र एकूण सारासार विचार करुन, बविआला बंडखोरीचा फायदा मिळू नये आणि विरार-नालासोपारातील रहिवाशांची दैना थांबावी यासाठी राजन नाईक यांनी बंडाची तलवार म्यान केली आहे.
मी भाजपाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. माझ्यासह माझे सर्व कार्यकर्ते आता एकदिलाने प्रदीप शर्मा यांच्या पाठीशी असून महायुती नालासोपाराचा कायापालट घडवण्यासाठी आता सज्ज झाली आहे. आता बदल होईलच, असा ठाम विश्वास राजन नाईक यांनी व्यक्त केला आहे.
मी पक्षशिस्तीला सर्वोच्च मानणारा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. पक्षश्रेष्ठींशी झालेल्या चर्चेअंती येथील रहिवाशांचे हित अंतिम असल्यामुळे बविआला फायदा मिळेल आणि येथील गैरकारभार पुढेही सुरू राहील अशी कुठलीही गोष्ट न करण्याचा निर्णय मी घेतला आहे. भाजपा आणि रा.स्व. संघाशी एकनिष्ठ असलेल्या आम्हा सर्व कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची फळी एकजुटीने महायुतीचे उमेदवार प्रदीप शर्मा यांच्याच विजयासाठी प्रचारात उतरणार आहे, असे राजन नाईक यांनी सांगितले.