
वसई विरार महानगर पालिकेकडून पेल्हार विभाग प्रभाग समिती एफ मध्ये होणारी दिखावा कारवाई बंद करून रिचर्ड कंपाऊंड व उमर कंपाउंड मध्ये झालेल्या संपूर्ण अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीचे वसई रोड चे अध्यक्ष उत्तम कुमार यांनी केली आहे. पेल्हार विभाग प्रभाग एफ समिती कडुन होणाऱ्या कारवायांवर भाजपा वसई रोड कडून प्रश्न चिन्ह उपस्थित केले गेले आहे? यावेळी बोलताना त्यांनी काही मोजकीच बांधकामे का तोडली जातात? या मागे कोणते अर्थशास्त्र जोडलेले आहे का? याचा तपास पालघर पोलीस प्रशासन व आयुक्त बळीराम पवार यांनी करणे गरजेचे आहे असे ही ते म्हणाले. स्थानिक सत्ताधारी पक्ष व त्यांच्या नगरसेवकांच्या काही माणसांकडून येणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष निधी उभा करण्यासाठी बांधकामांना परवानगी किंवा डोळेझाक करण्यासाठी लक्ष्मीदर्शन ही केले जात असल्याची माहिती असल्याचे उत्तम कुमार म्हणाले. आयुक्त बळीराम पवार यांनी रिचर्ड कंपाउंड व उमर कंपाउंडमध्ये झालेल्या हजारो-लाखो स्क्वेअर फिटच्या अनधिकृत बांधकामांवर जातीने लक्ष देऊन बांधकाम केलेल्या सर्व विकासकांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी उत्तम कुमार यांनी केली आहे. कारवाईसाठी त्या आशयाचा पत्र व्यवहारही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार राजेंद्र गावित, पालघर पोलीस, आयुक्त बळीराम पवार, पेल्हार विभाग प्रभाग समिती एफ यांच्याशी केला असून तब्बल 20 छायाचित्रेही सोबत जोडली आहेत. जे पाहिले की, केवढ्या भयावह, भयानक अश्या पध्दतीने हे अनधिकृत बांधकामांचे पेव वसई तालुक्यात सुटले आहे याचा आपल्याला अंदाज येईल असे ते म्हणाले. यावेळी वसई-विरार महानगर पालिकेमध्ये एक हाती सत्ता असलेला पक्ष बहुजन विकास आघाडी व त्याचे अध्यक्ष व त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत असलेल्या हितेंद्र ठाकूर यांच्या विषयी बोलताना त्यांनी “आमदार हितेंद्र ठाकूर यांनी या बेछूट सुटलेल्या अनधिकृत बांधकामांबाबत आपल्या पक्षाची भूमिका काय आहे हे एकदा स्पष्ट करावे” असे आवाहन त्यांनी केले आहे.