मनुष्यदिन निर्मिती करण्यात पालघर राज्यात तिसरा क्रमांक

रोजगार हमी योजना पालघर जिल्ह्यात प्रभावी

अकुशल कामाच्या शोधात बाहेर पडणाऱ्या आदिवासी मजूर कुटुंबाना रोजगार हमी योजनेतून (मनरेगा) मोठ्या प्रमाणात स्थानिक पातळीवर हाताला काम उपलब्ध होत असल्याने रोजगार हमी योजना पालघर जिल्ह्यात प्रभावी ठरत आहे.काम शोधण्यासाठी स्थलांतर होणारी अनेक कुटुंबे कोरोना स्थितीत कामे मंदावल्याने गावाबाहेर पडू शकत नसली तरी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गावाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेली कामे त्यांनी मागणी केल्याचे पहावयास मिळाले.

रोजगार हमी योजने मध्ये पुन्हा एकदा पालघर जिल्हा राज्यात अव्वल आला आहे. जिल्ह्यात विविध शासकीय यंत्रणांनी योजनेअंतर्गत केलेल्या कामांमध्ये मनुष्यदिन निर्मिती करण्यात पालघर जिल्ह्याचा तिसरा तर मनुष्य दिन उपस्थितीमध्ये दुसरा क्रमांक लागतो. पालघर जिल्हा सद्यस्थितीत रोजगार हमी योजनेमध्ये सर्वात पुढे आहे. विशेषतः पालघर जिल्ह्यातील बहुतांश आदिवासी कुटुंब मजुरांना या योजनेअंतर्गत काम दिले जात आहे. त्यामुळे अधिकाअधिक मजूर कामे करीत आहेत. ही योजना प्रभावी राबविल्यामुळे जिल्ह्यातील स्थानिक स्तरावर मजुरांना कामे उपलब्ध होत आहेत. यामुळे भविष्यात जिल्ह्यातील आदिवासी कुटुंबांचे रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबेल असा विश्वास जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे.

रोजगार हमी योजनेअंतर्गत काम मिळविण्यासाठी नमुना-4 म्हणजे मागणी नमुन्यामध्ये अर्ज करणे आवश्यक असते. जिल्हा प्रशासनाने सर्व संबंधितांना मजुरांकडून मागणी याद्या स्वीकारून त्यांचे पाच दिवसात आवश्यक नमुन्यांमध्ये मागणी सादर करण्याच्या सूचना अधिकारीवर्गाला दिल्या आहेत.रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्हा प्रशासन संबंधितांचा नियमित आढावा बैठकांचे आयोजन करून योजनेत काम करण्यासाठी मजुरांना प्रोत्साहन देण्यासोबत तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न करीत आहेत.

जिल्ह्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत दिली जाणारी सर्वाधिक कामे ही ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध असून कृषी विभाग, वनविभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, सामाजिक वनीकरण अशा विविध विभागामार्फत ही कामे जिल्ह्यातील जॉब कार्डधारकांना त्यांच्या मागणीनुसार उपलब्ध करून दिली जात आहेत.या आधी लॉकडाऊन मध्येही रोजगार हमी योजना प्रभावी काम करत होती त्यामुळे मनरेगाचा आलेख वाढला होता.

जिल्ह्यातील विविध शासकीय यंत्रणा स्तरावर मोठ्या प्रमाणात कामे शेल्फवर उपलब्ध करून दिली असल्यामुळे रोजगार हमी योजनेच्या नोंदणीकृत जॉब कार्ड धारक कामे मागण्यास सुरुवात केली आहे. त्यातून त्यांना उपजीविकेचे साधन उपलब्ध झाले

यादरम्यान रोजगार हमी योजनेमध्ये ग्रामीण भागातील जास्तीत जास्त मजुरांना सामावून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत राबवण्यात आलेल्या मोहिमेमध्ये पालघर जिल्ह्याच्या 280 ग्रामपंचायतीमध्ये 1388 कामांवर 82 हजारापेक्षा जास्त मजूर उपस्थिती 12 जानेवारी पर्यंत होती. यामध्ये जव्हार, विक्रमगड, मोखाडा, वाडा या तालुक्याने शंभर टक्के पेक्षा जास्त मनुष्यदिन निर्मितीचे उद्दिष्ट साध्य केलेले आहे तर इतर तालुक्यांमध्ये समाधानकारक मनुष्यजन्म निर्मिती दिसून येते.

जिल्ह्यातील विक्रमगड, जव्हार, वाडा, मोखाडा व डहाणू तालुक्यात रोजगार हमी योजना खूपच प्रभावीपणे कार्यरत असून याचा थेट फायदा स्थानिक स्तरावर असलेल्या गरजू नागरिकांना होत आहे.या ठिकाणी प्रत्यक्षात रोजगार हमी योजनेतून कामे उपलब्ध होत असल्यामुळे तसेच आता जिल्हा प्रशासनाने रोजगार हमीवर काम करणाऱ्या मजुरांना मध्यान्ह भोजन देण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतल्यामुळे योजनेमध्ये काम करणार्‍यांचे प्रमाण खूप वाढले आहे.

रोजगार हमी योजनेअंतर्गत पालघर जिल्ह्यात 2020-21 या आर्थिक वर्षामध्ये 8 तालुके मिळून 23 लाख 59 हजार 443 मनुष्याने निर्मितीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यामध्ये 12 जानेवारी पर्यंत जिल्ह्याने 30 लाख 50 हजार 762 इतके मनुष्यदिन निर्मितीचे उद्दिष्ट साध्य केले आहे. म्हणजेच दिलेल्या उद्दिष्टापेक्षा 128.75 टक्के उद्दिष्ट साध्य झाले आहे. त्यामुळे ही योजना जिल्ह्यातील आदिवासी भागांमध्ये प्रभावी ठरू लागली आहे आणखीन तीन महिन्याचा कालावधी बाकी असल्यामुळे ही टक्केवारी आणखीन वाढणार आहे. त्यामुळे गतवर्षी प्रमाणे या वर्षीही या योजनेमध्ये पालघर जिल्ह्यात समाधानकारक काम केले असून केलेल्या कामांमध्ये मनुष्यदिन निर्मिती करण्यात पालघर जिल्ह्याचा तिसरा तर मनुष्य दिन उपस्थितीमध्ये दुसरा क्रमांक लागतो. रोजगार हमी योजनेत आणखीन जोमाने काम करून बहुतांश मजुरांना सामावून घेऊन राज्यात पालघर जिल्हा अव्वल स्थान निर्माण करेल असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी व्यक्त केला आहे.

:
रोजगार हमी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे ग्रामीण भागातील मजुरांना मोठ्या प्रमाणात रोजगार प्राप्त होत आहे रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्यामुळे स्थलांतर नक्कीच थांबेल असा विश्वास आहे – सुरेंद्र नवले, उपजिल्हाधिकारी, रोजगार हमी योजना

पालघर जिल्ह्यातील ग्रामपंचायती- 477

रोजगार हमी कामे सुरू असलेले ग्रामपंचायती-280

एकूण सुरू असलेली कामे-1388

एकूण मजूर उपस्थिती-82505

मनुष्यदिन निर्मिती अहवाल (12जानेवारी पर्यंत)

तालुका उद्दिष्ट साध्य टकेवारी
डहाणू 146669 -115805 – 78.96
जव्हार 547341- 933560- 170.56
मोखाडा 261113-294802-112.90
पालघर 92645- 82960 – 89.55
तलासरी 68714- 58207 – 84.71
वसई 12321 – 8131 – 65.99
विक्रमगड 925504-1220877-131. 91
वाडा 315136 – 336420 – 106.75
एकूण 2369443-3050762-128.75

मनुष्यदिन उपस्थिती अहवाल
तालुका- ग्रामपंचायत- कामे प्रगती पथावर- मजूर
विक्रमगड-42-459-36766
जव्हार-46-313-19478
मोखाडा-26-118-12040
वाडा-66-195-11505
पालघर-37-140-1208
डहाणू-42-108-817
तलासरी-15-45-673
वसई-06-10-18
एकूण-280-1388-82505

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *