

पेल्हार प्रभाग समिती एफ येथे अतिक्रमण विभागात अनधिकृतपणे नियुक्तीवर असलेला ठेका अभियंता योगेश रविकांत सावंत हा पंधरा हजार रुपयांची लाच घेताना सोमवार दिनांक 16 सप्टेंबर 2019 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात फसला होता.
योगेश रविकांत सावंत याला अटक केल्यानंतर त्याचा मोबाईल जप्त करण्यात आला असून त्याचे कॉल डिटेल्स आणि मोबाईल मधील व्हॉइस रेकॉर्डिंग याची पडताळणी सुरू आहे. या तपासणी मधून अनेक खळबळजनक गोष्टी बाहेर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सुरुवातीच्या माहितीवरून योगेश रविकांत सावंत याने विरारमधील एका पत्रकारास 181 कॉल केल्याचे तसेच त्या पत्रकाराने योगेश रविकांत सावंत यास 128 कॉल केल्याचे स्पष्ट होत आहे.
सदरचा पत्रकार योगेश रविकांत सावंत या लाचखोर ठेका अभियंत्याच्या संपर्कात कशासाठी होता याची पडताळणी होणे अजून शिल्लक असून योगेश रविकांत सावंत यांच्या चौकशीमध्ये याबाबतीत अधिक खुलासा होणे अपेक्षित आहे. योगेश रविकांत सावंत याचे सदर पत्रकाराच्या विरार विठ्ठल मंदिर येथील कार्यालयात नियमित जाणे-येणे असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
यामुळे योगेश रविकांत सावंत यांनी भ्रष्ट मार्गाने कमावलेल्या करोडो रुपयांच्या संपत्ती मध्ये सदर पत्रकाराचा सहभाग किती याची चौकशी होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे
योगेश रविकांत सावंत यांची शेवटची नियुक्ती वसई उद्यान विभागात असल्याचे कागदपत्रांवरून दिसून येत असले तरी योगेश पेल्हार विभागात अतिक्रमण ठेका अभियंता म्हणून कशी काय वसुली करत होता याबाबतीत महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी खुलासा देऊ शकतील.
अधिक चौकशीमध्ये योगेश रविकांत सावंत हा पेल्हार विभागात अनधिकृतपणे नियुक्तीवर असल्याचे स्पष्ट होत असून महानगरपालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने योगेश रविकांत सावंत हा पेल्हार विभागात कार्यरत असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे महानगरपालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे
पेल्हार विभागात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे सुरू असून या बांधकाम धारकांकडून करोडो रुपयांची वसुली योगेश सावंत करत असे. या वसुली मधील वाटा महानगरपालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत तसेच विरार मधल्या एका पत्रकारांपर्यंत जात असल्याचे सांगितले जात आहे.
योगेश रविकांत सावंत याच्यावर वालीव पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 7 व 12 अन्वये दिनांक 17 सप्टेंबर 2019 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान योगेश सावंत याला सोडवण्याकरता काही झोलाछाप पत्रकारांनी पोलीस स्टेशनला धाव घेतली होती. योगेश सावंत याला रात्री जेवण पुरवण्या पासून इतर सगळी सोय पाहण्यापर्यंत सर्व कामे काही पत्रकारांनी अतिशय मनोभावे केल्याचे समजते. यामुळे वसईतील भ्रष्ट पालिका अधिकारी आणि काही मोजके झोलाछाप पत्रकार यांच्यातले संबंध स्पष्ट झाले आहेत.
या प्रकरणात अजून काही गौप्यस्फोट शिल्लक असून योगेश सावंतच्या मोबाईल मधील कॉल डिटेल्स आणि रेकॉर्डिंग पडताळणीनंतर काही प्रतिष्ठित पालिका अधिकारी आणि पत्रकार यांचा बुरखा फाटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.